कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, रविवारी रुग्ण आणि बळींच्या संख्येने दुसऱ्या लाटेतील उच्चांक केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. नवे ५९४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, बळींच्या संख्याही १५ वर पोहोचली आहे. उपचार घेत असलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८८० झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पाचशेवर रुग्ण सापडल्याने आरोग्य व प्रशासन यंत्रणा अधिक अलर्ट झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने लॉकडाऊन कडक झाल्याने नागरिक बऱ्यापैकी घरात बंद झाले आहेत. तरीदेखील संसर्गाचा वाढणारा आकडा उरात धडकी भरवणारा ठरत आहे. शनिवारी ५९१ रुग्ण आढळले होते. यात रविवारी आणखी तिघांची भर पडली. मृत्यूही गेल्या दोन दिवसांपासून १२ होते, त्यात रविवारी तिघांची भर पडून ती १५ वर गेली. ही संख्या या वर्षातील सर्वात मोठी ठरली आहे. विशेष म्हणजे रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज होणारी संख्याही कमी झाली आहे. शनिवारी २७६ जण बरे होऊन घरी परतले होते, रविवारी केवळ १५२ जणांनाच डिस्चार्ज झाला. बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने चिंता आणखी वाढली असून, आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे.
कोल्हापूर शहरात सर्वाधिक २२८ रुग्ण सापडले असून, ग्रामीण भागातही प्रमाण वाढले आहे. करवीरमध्ये ७०, हातकणंगलेत ५०, भूदरगडमध्ये ३२, पन्हाळ्यात २५, अशी कोरोनाची लागण झालेल्यांची सर्वाधिक आकडेवारी नोंदवली गेली आहे. बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या ६४ जणांचे अहवालही पाॅझिटिव्ह आले आहेत.
कोरोना अपडेट
रविवार १८ /०४/ २०२१
आजचे रुग्ण : ५९४
आजचे मृत्यू : १५
उपचार घेत असलेले : ३८८०
आजचे डिस्चार्ज : १५२
तालुकानिहाय रुग्णसंख्या
कोल्हापूर शहर : २२८
नगरपालिका : १४
करवीर : ७०
हातकणंगले : ५०
भूदरगड : ३२
पन्हाळा : २५
शिरोळ : २१
आजरा : १९
शाहूवाडी : १८
गडहिंग्लज : १६
राधानगरी : १२
चंदगड : १२
कागल : ११
गगनबावडा : ०२
एकूण मृत्यू : १५
जिल्ह्यातील मृत्यू : १३
इतर जिल्ह्यातील : ०२
(शेळेवाडी, ता. राधानगरी ५० वर्षे पुरुष, कोंडे, ता. शाहूवाडी ६० वर्षे महिला, शिवाजी पुतळा ५८ वर्षे पुरुष, मंगळवार पेठ ८० वर्षे महिला, भामटे, ता. करवीर ६० वर्षे पुरुष, तारदाळ, ता. हातकणंगले ५५ वर्षे महिला, कोरोची, ता. हातकणंगले ६६ वर्षे महिला, रुकडी, ता. हातकणंगले ६० वर्षे महिला, दुगणवाडी, ता. गडहिंग्लज ८२ वर्षे पुरुष, महागाव, ता. गडहिंग्लज ६० वर्षे पुरुष, गडहिंग्लज ४८ वर्षे पुरुष, बारवे, ता. भूदरगडमधील २७ वर्षे पुरुष, वारुनूळ, ता. पन्हाळा ७० वर्षे पुरुष)
इतर जिल्ह्यातील :(चिपळूण, जि.रत्नागिरी ८० वर्षे महिला, शिरूर जि. पुणे ४४ वर्षे पुरुष)
चौकट
रेमडेसिविरचे १९४ इंजेक्शन उपलब्ध
रेमडेसिविरच्या इंजेक्शनची टंचाई रविवारी देखील कायम राहिली. अवघे १९४ इंजेक्शनच उपलब्ध झाल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना प्रचंड धावाधाव करावी लागली. सोमवारी पुरवठा होईल असे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.