कोल्हापूर : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात दानधर्म या पुण्यकार्याला विशेष महत्त्व आहे. यंदाच्या कोरोना आपत्तीत पैसा, वस्तूंच्या पलिकडे जाऊन रुग्णांना ऑक्सिजनरुपी श्वास देण्याचे पुण्यकार्य येथील मणेर मशिदीच्यावतीने केले जात आहे. गेल्या १५ दिवसात ५०हून अधिक रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले आहेत. एकीकडे कोरोनामुळे माणसं एकमेकांपासून दूर जात असताना इथे मात्र रुग्णांना श्वासाचे दान दिले जात आहे.रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे रोजे असतात. या काळात केलेले दानधर्म, पुण्यकर्म ही जन्नतपर्यंत नेतात, अशी मुस्लिम बांधवांची श्रद्धा आहे. एवढचे काय जिल्ह्यात कोणतीही आपत्ती येवो, हे बांधव मदतीसाठी स्वत: पुढे सरसावतात आणि हाती घेतलेले काम पूर्ण करुनच थांबतात. गतवर्षी बैतुलमाल कमिटीने कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्काराचे मोठे काम केले होते.जिल्ह्यात सध्या कोरोनाने कहर केला असून, रुग्णालयांमध्ये अडीच हजारांवर रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. गृह अलगीकरणातील रुग्णांची संख्या वेगळी आहे. अशा रुग्णांचा एचआरसीटी स्कोर जास्त झाला की, त्यांना ऑक्सिजनची गरज भासते. पण सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनचा इतक्या मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे की सहजासहजी तो मिळणे शक्य नाही, अनेकदा दवाखान्यात बेडही मिळत नाही.
अशावेळी रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांचीही घालमेल सुरु होते, या रुग्णांचा जीव वाचावा, यासाठी मणेर मशीद पुढे आली आहे. मशिदीतर्फे गेल्या १५ दिवसांपासून रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन सिलिंडर पुरवला जात आहे. ही सुविधा केवळ गृह अलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांसाठी आहे कारण एकदा रुग्ण दवाखान्यात दाखल झाला की, तेथे त्याची ऑक्सिजनची सोय होते.आपल्याकडून दिला जाणारा मोफत ऑक्सिजन रुग्णापर्यंतच पोहोचावा, त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी रुग्णाचे नाव, त्यांचा एचआरसीटी स्कोर, अहवाल आणि डॉक्टरांची चिठ्ठी, आधारकार्ड यांची तपासणी करुनच सिलिंडर दिला जातो. या कार्यासाठी शफीक मणेर, हाजी ईर्शाद टिनमेकर, असिफ मोमीन, इम्रान मणेर यांच्यासह समाजातील ज्येष्ठ नागरिक व तरुणाई एकवटली आहे.स्वखर्चातून उभारली यंत्रणामशिदीकडे सध्या ४० ऑक्सिजन सिलिंडर आहेत, रिकामे सिलिंडर रोज कोल्हापुरातील ऑक्सिजन उत्पादकांकडून भरून आणले जातात, त्यासाठी लागणारा पैसा मुस्लिम बांधवांनी स्वत:च्या खिशातून उभारला आहे. त्यांच्या या कार्याला सलाम करत अन्य समाजबांधवदेखील पुढे आले आहेत, ३०-४० कार्यकर्त्यांची फळी या कामात राबत आहे.
कोणत्याही धर्मापेक्षा मानवधर्म मोठा आहे. श्वास सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. गृह अलगीकरणातील गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन देऊन आम्ही अल्लाहचीच सेवा करत आहोत. आपल्या सेवेमुळे जीव वाचतोय, हेच सर्वात मोठे समाधान आहे.- हिदायत मणेर