कोपार्डे : करवीर तालुक्यात रविवारी एका दिवसात ५१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने तालुक्यातील कोरोना रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. घर टु घर अँटिजन चाचणी, लसीकरण हे प्रभावीपणे राबवूनही दररोजच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्ह्यात करवीर तालुका अति हॉटस्पॉट झाला असल्याचे चित्र आहे.
करवीर तालुक्यात दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्यानंतर जून व जुलै महिन्यात धोकादायक स्वरूप धारण केले आहे. या दोन महिन्यांत तालुक्यात उच्चांकी कोरोना रुग्ण व कोरोना बळी गेले आहेत. इतर तालुक्यांतील कोराना रूग्णांची संख्या कमी होत असताना करवीर तालुक्यातील रुग्णसंख्या तिप्पट, चौपट वाढत असल्याने करवीर तालुका अति हॉटस्पॉट बनत चालला आहे.
करवीरमधील हॉटस्पॉट गावात ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ हे अभियान काही ग्रामपंचायतींनी गंभीरपणे राबवले. पण शहराशी असणारा संपर्क व लॉकडाऊनचे नियम पाळण्यासाठी ग्रामपंचायत, प्रशासन व राजकीय अनास्था यामुळे समूह संसर्ग रोखण्याचे उपाय होत नाहीत अथवा जनतेकडून याला प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाच्या मोठा फैलाव झाला आहे.
करवीर तालुक्यातील २५ गावे कोरोनामुक्त झाल्याची शासकीय आकडेवारी प्राप्त होत असली तरी दरदिवशी येणारे कोरोना पॉझिटिव्हचा आकडा धोकादायक बनत चालला आहे. दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यापासून करवीर तालुक्यात तब्बल २२ हजार ८५० कोरोना पॉझिटिव्ह आकडा आला आहे. यातून ९२ टक्के रिकव्हरी रेट असला तरी ५२९ जणांचा बळी गेला आहे.
रविवारी एका दिवसात पुन्हा ५१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागापुढे आव्हान निर्माण झाले आहे.