हुपरी : हुपरी (ता.हातकणंगले) येथील प्रसिद्ध चांदी उद्योजक अमोल बजरंग माळी (वय 55, रा मेन रोड, हुपरी)यांनी कोरोना पॉझिटीव्ह उपचारानंतरही सातत्याने होत असलेल्या त्रासाला वैतागून आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आपल्या बेडरूम मध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडुन घेवुन आत्महत्या केली.
या घटनेने हुपरी परिसरात मोठय़ाप्रमाणात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलिसात झाली असुन पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के व त्यांचे सहकारी घटनास्थळी येवुन तपासणी करीत आहेत.अमोल माळी हे एक प्रतिथयश यश चांदी उद्योजक होते. अगदी अल्पावधीतच त्यांनी आपल्या परंपरागत चांदी व्यवसायाचा मोठय़ा प्रमाणात विस्तार केला होता.गेल्या कांही दिवसापूर्वी त्यांना कोरोना संसर्गची लागण झाली होती. कोल्हापूरातील खाजगी दवाखान्यात उपचार घेवुन बरे होवून ते घरी विश्रांती घेत होते. त्यांना पूर्वीपासून दम्याचा त्रास होत होता. त्यातच कोरोना संसर्गमुळे त्यांना आणखीन जास्तच त्रास होत होता.
सातत्याने होणाऱ्या त्रासाला वैतागून आज सकाळी 6 च्या सुमारास बेडरूममध्ये कोणी नाही याची खात्री करून घेत डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडुन घेवुन आत्महत्या केली. पिस्तुलातुन उडालेल्या गोळीच्या आवाजाने घरातील सर्वानी त्यांच्या बेडरूमकडे धाव घेतली असता तेथील द्रुश्य पाहुन कुटुंबाने एकच आक्रोश केला.
हा सर्व प्रकार सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्याना समजल्याने त्यांच्या घरासमोर मोठी गर्दी जमा झाली होती. ही घटना हुपरी पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवुन तपासास सुरुवात केली.