कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही म्हणून महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी १२२ व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून ३३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे आवश्यक असले, तरीही शहरात काही नागरिक बेफिकीरपणे वागत आहेत. अशांवर महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने ही कारवाई केली.
विनामास्क फिरणाऱ्या ९७ जणांकडून ९,७०० रुपये, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या १६ जणांकडून ८ हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने सहाजणांकडून १,२०० रुपये व प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल तिघांकडून १५ हजार रुपये असा एकूण १२२ जणांकडून ३३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अग्निशमन विभागाकडून शहरातील २४ मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. यावेळी कावळा नाका व कळंबा रिंगरोड येथील तीन मंगल कार्यालयांना तीन हजार रुपयांचा दंड करण्यात आला.