राशिवडे : राधानगरी तालुक्यातील राशिवडे, धामोड, म्हासुर्ली या गावांसोबत अन्य गावांवर घातलेले कोरोना निर्बंध अन्यायकारक असून, शिथिलता आणावी, असे निवेदन पंचायत समिती सदस्य उत्तम पाटील, राधानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चौगले, राशिडेचे माजी सरपंच सागर धुंदरे यांनी राधानगरीचे तहसीलदार मीना निंबाळकर यांना दिले.
निवेदनात राधानगरी तालुक्यात ५९ रुग्ण उपचार घेत असून, अलगीकरण सेंटरमध्ये रुग्ण आहेत. तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगली सेवा दिल्याने मृत्यूदर कमी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे.
अन्य तालुक्यांच्या तुलनेने राधानगरी तालुक्यात रुग्णसंख्या कमी असताना व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, उद्योगधंदे व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. व्यवसाय बंद, रोजगार बुडाला असल्याने बँकेचे हप्ते त्याचे व्याज भरणे मुश्कील होत आहे. या सर्वांचा विचार करून १४ दिवसांचा लॉकडाऊन ७ दिवसांचा करावा, असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
कोट
राधानगरी तालुक्यात १० पेक्षा जास्त रुग्ण संख्या असलेली सोळा गावे आहेत. अशा गावांवर पूर्ण निर्बंध लावलेले आहेत. १० पेक्षा कमी रुग्ण असलेल्या गावात काहीप्रमाणात निर्बंध घातलेले आहेत. सरपंच व ग्रामदक्षता समितीने दररोजची रुग्णसंख्या व माहिती संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी व रुग्णसंख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करावी. असे करून जर रुग्णांची संख्या कमी झाली, तर निर्बंधात शिथिलता आणता येईल.
मीना निंबाळकर,
तहसीलदार, राधानगरी.