कोल्हापूर : कोरोनाग्रस्त मृत महिलेच्या हातातील सुमारे एक लाख रुपये किमतीच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या रुग्णालयातून अज्ञाताने चोरल्याचा प्रकार घडला. तो शिवाजी पार्कमधील एका नामवंत रुग्णालयामध्ये घडला. या चोरीबाबत मृत महिलेच्या मुलाने गुरुवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.याबाबत माहिती अशी की, नेज (ता. हातकणंगले) येथील सखुबाई नेजकर-कांबळे (वय ६५) यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने दि. १२ जुलै रोजी दुपारी शिवाजी पार्कमध्ये रुग्णालयात कोरोना संशयावरून उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी रुग्णाला तातडीने ऑक्सिजन व सलाईन लावून उपचार सुरू केले. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्या महिलेच्या कानांतील कर्णफुले व पायांतील जोडवी काढून नातेवाइकांकडे दिली; पण त्याच वेळी त्यांच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र व दोन्हीही हातांत एकूण चार तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या होत्या.
ऑक्सिजन लावल्याने तसेच हाताला सलाईन असल्याने ते दागिने नंतर देऊ असे रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यानंतर रुग्णाचा स्राव घेऊन तपासणीसाठी पाठवला. पण दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता त्या महिलेचा मृत्यू झाला. पण कोरोना चाचणी अहवाल आला नसल्याने संशयित म्हणून मृतदेह बॅगमध्ये बांधून देण्यात आला.
मृतदेहासोबत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दिले; पण त्यावेळी पाटल्या नव्हत्या. दुसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन केल्यावेळीच मृताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वच जण क्वारंटाईन झाले; पण सोन्याच्या पाटल्यांबाबत रुग्णालयाच्या प्रशासनाला वारंवार विचारूनही नंतर त्यांनी टाळाटाळ केली.नाइलाजास्तव मृताचा मुलगा शीतल मलगोंडा नेजकर (रा. ५८१-६/७, प्लॉट नं. ३, म्हाडा कॉलनीजवळ, आर. के.नगर, कोल्हापूर) याने अखेर शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मृत आईच्या हातातील सोन्याचे दागिने रुग्णालयामधून चोरीला गेल्याची तक्रार दिली.सीसीटीव्ही फुटेजही दिलेआपल्या आईला त्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला पुन्हा अतिदक्षता विभागात नेईपर्यंत तिच्या हातात सोन्याच्या पाटल्या रुग्णालयामधील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात दिसत होत्या; पण अतिदक्षता विभागात आम्हाला कोणालाही घेतले नाही. त्यानंतर ते दागिने पुन्हा दिसलेच नाहीत, अशी तक्रार मृताचा मुलगा शीतल नेजकर यांनी पोलिसांत दिली व रुग्णालयामधील सीसी टीव्हीचे फुटेजही पोलिसांकडे सादर केल्याचे त्याने सांगितले.