येथील राजर्षी शाहू विद्यालयात गुरुवारी चिमुकल्यांना पोलिओ, रोटा व्हायरस, टिवीसीचे डोस देण्यात येत होते. मात्र, याच इमारतीत नागरिकांचे कोरोना स्वॅबही घेतले जात असल्याचे समजल्यानंतर पालकांची झोपच उडाली. त्यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर डोस आणि स्वॅब तपासणीची स्वतंत्र सोय केली. एक महिना ते तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओ, रोटा व्हायरस, टिवीसी, आदी डोस देण्याची व्यवस्था येथील ११ नंबर शाळेत केली होती. पूर्वकार्यक्रमानुसार चाळीस पालक आपल्या पाल्यांना घेऊन सकाळी आठपासून शाळेत आले. मात्र, शाळेला कुलूप असल्याने त्यांना तान्हुल्यांसह दारातच ताटकळत उभे रहावे लागले. याचवेळी शाळेच्या जवळच कोरोना स्वॅब तपासणी केंद्र असल्याचे समजल्यानंतर पालकांचा ठोका चुकला. तान्हुल्यांना संसर्गाचा धोका असल्याने तक्रारी पालकांनी बोलून दाखवल्या. याबाबतची तक्रार महापालिकेकडे झाल्यानंतर यंत्रणा हलली. महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी शाळेला भेट देऊन स्वतंत्र दोन मार्ग असलेल्या इमारतींत डोस आणि स्वॅबची सोय केली.
कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर येथे लहान मुलांचे डोस आणि कोरोना संशयितांची स्वॅब तपासणी केंद्र एकाच ठिकाणी सुरू होते. याप्रकरणी तक्रार झाल्यावर डोस आणि स्वॅबची सोय वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली.