कोल्हापूर : ‘कोरोना’चा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील कारागृहातील कैद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी प्रत्यक्ष उपस्थित ठेवण्यास ३१ मार्चपर्यंत मनाई करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील ६२ कैद्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली.
अशा पध्दतीने सुनावणी करण्यात आल्याने अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांच्या आदेशानुसार कोल्हापूरसह सांगली, सातारा व पुणे पोलिसांचे गार्ड परत पाठविण्यात आले. ही कामगिरी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी पार पाडली.‘कोरोना’च्या धास्तीमुळे राज्यातील सर्व कारागृहांतील कैद्यांची ने-आण करण्याची प्रक्रिया तूर्त थांबली आहे. दि. ३१ मार्चपर्यंत कैद्यांना थेट न्यायालयात सुनावणीसाठी हजर न ठेवता आवश्यकतेनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीसाठी उपस्थित ठेवण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. त्याबाबत राज्याचे अप्पर महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांनी कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांच्याशी चर्चा करून ‘कोरोना’ची लागण कैद्यांना अगर अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.कोरोना विषाणूचा फैलाव राज्यभर वाढला असल्याने राज्यातील सर्वच कारागृहांनी त्याची धास्ती घेतली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात अगर इतर ठिकाणी न्यायालयीन कामासाठी कैद्यांना ने-आण करावी लागते. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कारागृहातील कैद्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात सुरुवात झाली.राज्यातील कारागृहात ३८ हजार कैदीराज्यातील सर्वच कारागृहांत सुमारे ३८ हजारांवर कैदी आहेत. सुनावणीसाठी कैद्यांची नेहमीच ने-आण सुरू असते. नवीन कैदी वाढत असतात. या पार्श्वभूमीवर नवीन कैद्यांची कारागृहात रवानगी करण्यापूर्वी त्यांची मुख्य प्रवेशद्वारातच वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कारागृहात शिक्षा भोगणाºया अगर शिक्षेविरुद्ध अपिल केलेल्या कैद्यांना पोलीस बंदोबस्तात रोज न्यायालयात हजर ठेवावे लागते. त्यामुळे कैद्यांची ने-आण करताना त्यांना ‘कोरोना’चा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून व्हीसीद्वारे सुनावणी करण्यात येत आहे.कारागृहाच्या इतिहासात मोठ्या संख्येने प्रथमच व्हीसीकारागृहाच्या इतिहासात एकाच दिवशी सुमारे ६२ कैद्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्याची ही प्रथमच घटना आहे. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील १५, सातारा जिल्ह्यातील १३, सोलापूरमधील १४ तर मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या पुणे जिल्ह्यातील २० अशा एकूण ६२ कैद्यांची सुनावणी व्हिसीद्वारे घेतली. सकाळी ११ ते २ आणि दुपारी २.३० ते ३ या वेळेत सुनावणी झाली.कळंबा कारागृहात कैदी
- पुरुष : २,३१७
- स्त्रिया : ८०
- परदेशी कैदी : ३५