लोकमत न्यूज नेटवर्क,
पोर्ले तर्फ ठाणे : गेले महिनाभर कोरोनाशी झुंज सुरू असलेल्या पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) दत्तात्रय शिवाजी घाटगे या युवकाचा दोन दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला. कुटुंबातील कर्त्यापुरुषाचा जीव तर गेलाचं! शिवाय उपचारांचा खर्च लाखो रुपये आल्याने कर्जाच्या खाईत लोटून आयुष्यभराची अर्थिक चिंता घाटगे कुटुंबाला कोरोना लावून गेला. पोर्लेतील तीन कर्त्यापुरुषांना कोरोनाने हिरावल्याने ती कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.
दत्ताने दहावी पास झाल्यानंतर दोन गुंठ्यात जगणं मुश्कील होणार म्हणून मागे वळून पाहत शिक्षण सोडून खासगी कंपनीत नोकरी धरली. परिस्थितीशी मिळतेजुळते घेत मोठ्या हिमतीने त्यांनी संसार सावरला होता. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पोर्लेतील कोविड सेंटरमध्ये बेड मिळाला नसल्याने त्यांना संजिवनी कोविडला दाखल केले. तिथे दोन दिवसांच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना खासगीत दाखल केले. तिथे त्यांच्यावर कोरोनाचे सर्व उपचार झाले; पण प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत राहिली. अखेर त्यांचा कोरोनाबरोबरचा लढा अपयशी ठरल्याने मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.
दत्ताचा खासगी दवाखान्यातील खर्च चार लाखांच्या दरम्यान गेला. घरातील शिल्लक, मित्रमंडळी, पै-पाहुणे यांच्याकडून हात ऊसने आणि कर्ज काढून दवाखान्याचे पैसे भरून मृतदेह ताब्यात घेतला. घाटगे कुटुंबीयांनी दत्ताला कोरोनाच्या दाढेतून सोडविण्यासाठी प्रयत्नाची पराकष्टा केली. पण यश मिळाले नाही. संयमी आणि मनमिळावू स्वभावाच्या दत्ताच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.