तालुक्यात काेरोना लसीकरणात मागे राहिलेल्या बाचणी येथे चार दिवसांपूर्वी प्रांताधिकारी रामहरी भोसले यांनी आरोग्य, महसूल व ग्रामपंचायत अशा तिन्ही विभागांची बैठक घेऊन वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्याचे आवाहन केले होते. यानुसार तालुका आरोग्य विभागाच्या पुढाकाराने व महसूल आणि ग्रामपंचायत विभागाच्या सहकार्याने येथे लसीकरणाची मोहीम राबविली होती. सुमारे ७०० पेक्षा अधिक ग्रामस्थांची नोंदणी केली होती.
सरपंच इकबाल नायकवडी, उपसरपंच जी. डी. पाटील, अल्लाबक्ष शहानेदिवाण, उत्तम पाटील, उत्तम चौगले यांच्याहस्ते लसीकरण मोहिमेस गुरुवारी सकाळी १० वाजता सुरुवात केली. पण अपुरा लसीचा पुरवठा झाल्याचे समजताच ग्रामस्थांत एकच गोंधळ निर्माण झाला. पण स्थानिक प्रशासनाने सर्वांना लस पुरविण्याचे आश्वासन दिले. तसेच गावातील सुमारे १२३८ जण लसीकरणासाठी पात्र आहेत. पण केवळ ४१३ जणांनाच लस पुरली. उर्वरित तीनशेच्या वर नोंदणी केलेल्यांची उपेक्षा झाली. मात्र अपुर्या पुरवठ्याने लसीकरण थांबले.
दरम्यान, स्थानिक प्रशासनाने आरोग्य विभागाशी संपर्क साधून लस उपलब्ध करण्याबाबत विनंती केली आहे. आरोग्य विभागामार्फत जिल्ह्याहून पुरवठा झाल्यानंतर तत्काळ लसीकरण मोहीम राबविण्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अभिजित शिंदे यांनी दिली.