कोल्हापूर : शहरात आज, शनिवारी महापालिकेच्या पाच नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शासनाच्या पोर्टलवर नोंद झालेल्या ११ हजार ११९ आरोग्य कर्मचाऱ्यांना यावेळी लस दिली जाणार असून, महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी दिली. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शहरातील कोरोना लसीकरणाच्या सद्य परिस्थितीबाबत माजी पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या.
डॉ. अमोल माने यांनी लसीकरणाच्या नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेकडे लस पोहोच झाल्या असून, त्या ठेवण्यासाठी १२ शीतसाखळी केंद्रे आहेत. त्यापैकी एक मुख्य लसीकरण शीतसाखळी केंद्र सज्ज ठेवले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईनवरील महापालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. माजी महापौर निलोफर आजरेकर, हसिना फरास, संजस मोहिते, सचिन पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, शोभा कवाळे, सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मुसळे, नगरसचिव सुनील बिद्रे आदी उपस्थित होते.
चौकट
तपासणीसाठी येणाऱ्यांपैकी पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १ टक्के
सहायक आयुक्त संदीप घार्गे म्हणाले, आत्तापर्यंत १२ हजार ८६१ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी १२ हजार ३९६ बरे झाले आहेत. ३८ जणांवर उपचार सुरू असून, ४२७ जणांचा मृत्यू झाला आहे. शहराचा रिकव्हरी रेट ९६.३८ टक्के इतका आहे. सध्या घेण्यात येणाऱ्या तपासणी व त्यामध्ये आढळून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण केवळ १ टक्के आहे.
चौकट
रुग्ण आढळणाऱ्या परिसराचा तात्काळ सर्व्हे करा
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी, सध्या ज्या ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत, त्या भागाचा सर्व्हे जलदगतीने करून घ्यावा. याठिकाणी जादा पथक लावून सर्व्हे करावा, असे आदेश दिले. उपआयुक्त निखिल मोरे म्हणाले, महापालिकेकडून रोज ५०० लोकांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेतले जात असल्याचे सांगितले.
लसीकरण होणारी केंद्रे
सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल, महाडिक माळ, राजारामपुरी व सदर बाजार नागरी सुविधा केंद्र
फोटो : १५०१२०२१ केएमसी कोरोना न्यूज
ओळी : कोल्हापुरात कोरोना लसीकरण नियोजनाबाबत शुक्रवारी महापालिकेमध्ये माजी पदाधिकारी, प्रशासन यांची बैठक झाली.