कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये रोज सरासरी ३५ हजार कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसची गरज असताना आता आरोग्य विभागाकडे केवळ १९ हजार डोस शिल्लक आहेत. उपलब्ध डोस किती आहेत हे पाहूनच नागरिकांना लसीकरणासाठी पाचारण करावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे गुरुवारी अनेक केंद्रांवर लसीकरणाचे प्रमाण कमी होणार आहे.
जिल्हात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस दिले जात आहेत. मार्च अखेरीचा विचार करता लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. मंगळवारी ६ एप्रिल रोजी जिल्ह्यात ३५ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. असे असताना बुधवारी मात्र अनेक ठिकाणी लस संपल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर शहरात आणि ग्रामीण भागातून ही लस उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत.
आरोग्य विभागाकडे रोज ३५ हजार डोस याप्रमाणे आठ दिवसांसाठी २ लाख ८० हजार डोसची मागणी करण्यात आली आहे. मात्र गुरुवारीच लसीकरणासाठी १६ हजार डोसचा तुटवडा भासणार आहे.
केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी मान्यता दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. जिल्हा प्रशासनानेही यामध्ये लक्ष घातल्याने इतर गटातीलही लसीकरणाचा टक्का जिल्ह्यात वाढला आहे. आता मोठ्या संख्येने नागरिक लसीकरणासाठी बाहेर पडत असताना दुसरीकडे लस मर्यादित असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.
कोट
रोज जिल्ह्यात जेवढे लसीकरण होते त्यापेक्षा कमी डोस उपलब्ध आहेत. रोज ३५ हजार डोसप्रमाणे आठ दिवसांच्या डोसची आम्ही मागणी केली आहे. परंतु सध्या केवळ १९ हजार डोस उपलब्ध असल्यामुळे जेवढे डोस शिल्लक असतील तेवढ्याच नागरिकांना बोलावून लसीकरण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
डॉ. योेगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी