कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग थांबण्याचे नाव घेत नसून रोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात एकूण १६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे प्रशासकीय गलथानपणामुळे कोरोना चाचण्या करणाऱ्या दोन यंत्रांपैकी एक यंत्र आरएनए एक्स्ट्रॅक्शन किटस्अभावी बंद ठेवावे लागले. दुसऱ्या दिवशीदेखील ते बंदच राहिले.जिल्ह्यातील संसर्ग रोखण्याकरिता एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला होता; परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. दोन आठवड्यांपूर्वी कडक लॉकडाऊन पाळला. मात्र त्याच्या पुढच्याच आठवड्यात मात्र रुग्णांची संख्या प्रतिदिन ४०० ते ४५० च्या घरात गेली.
त्यामुळे केवळ लॉकडाऊन पाळून चालणार नाही, तर नागरिकांनीच पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे, याची जाणीव अधिक ठळकपणे झाली. शनिवारी दिवसभरात १६० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ६३०५ इतकी झाली आहे.रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना पॉझिटिव्ह आलेल्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्याही त्याच्या चार ते पाच पटींनी वाढत आहे. त्यामुळे या सर्वांची कोरोना चाचणी करणे आवश्यक ठरते. त्यामुळे प्रयोगशाळांवर प्रचंड ताण आला. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून दोनपैकी एक कोरोना चाचणी यंत्र बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. चाचणीकरिता आवश्यक असलेल्या आरएनए एक्स्ट्रॅक्शन किटसचा पुरवठा थांबला आहे. केवळ प्रशासनातील समन्वय आणि हलगर्जीपणामुळे एक यंत्र बंद आहे.दरम्यान, एक जादा स्वयंचलित जलदगती यंत्र शनिवारी दुपारी बसविण्यात आले. त्याचे कामही सुरू झाले. दिवसभरात केवळ ३०० चाचण्या झाल्या होत्या. गेल्या तीन दिवसांपासून थांबलेल्या सुमारे दोन हजार चाचण्या अहोरात्र काम सुरू ठेवून नवीन यंत्राद्वारे पूर्ण करण्याचा लॅबमधील तंत्रज्ञांनी निर्धार केला आहे.