कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून ३४१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही प्राथमिक आकडेवारी असून पुढील आठवड्यात आणखी नेमकी आकडेवारी उपलब्ध होणार आहे. मात्र, उपलब्ध आकडेवारीवरून विचार करता कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसदतीस लाख नागरिकांच्या सर्वेक्षणातून केवळ ३४५ जण पॉझिटिव्ह येतात. याचाच अर्थ नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढली आहे आणि संसर्गही कमी होत आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे सर्वेक्षण दोन टप्प्यांत राबविण्यात आले. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत पहिला टप्पा राबविण्यात आला. त्याच घरांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. ही दुसऱ्या टप्प्यातील मोहीम २४ ऑक्टोबरला संपली. त्यानंतर दोन्ही टप्प्यांतील आकडेवारीचे बाराही तालुक्यांतून संकलन सुरू होते. अजूनही ८५ हजार ६४५ घरांतील लोकसंख्येचे निष्कर्ष जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेले नाहीत. या मोहिमेसाठी २२३२ पथके कार्यरत करण्यात आली होती.गावपातळीवर शिक्षक, आशा, ग्रामपंचायतीपासून ते विविध खात्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सहयोगातून ही मोहीम राबविण्यात आली. ४१ लाख ५४ हजार ९३३ लोकसंख्येपैकी ३७ लाख ५४ हजार ३७ लोकसंख्येच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. त्यातील २९२ नागरिकांमध्ये सारीची लक्षणे आढळली आहेत.
फ्ल्यूची लक्षणे ५४२० नागरिकांमध्ये आढळली आहेत. अडीच लाखांहून अधिक नागरिकांना जुने आजार असून २८७९ रुग्णांना कोरोना चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले. त्यापैकी १८१३ जणांनी चाचणी करून घेतली आणि त्यापैकी ३४१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कार्यक्षेत्र पॉझिटिव्ह रुग्ण
- १२ तालुके १८०
- १४ नगरपालिका
- नगरपंचायती ०६७
- कोल्हापूर महापालिका ०९४
शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही सर्वेक्षण मोहीम यशस्वी करण्यात आली. यातील प्राथमिक आकडेवारी हाती आली आहे. अजूनही ८५ हजार घरांची दोन्ही टप्प्यांतील आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत तपासणी केलेल्या ३७ लाख ५४ हजार लोकसंख्येपैकी ३४१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. घरोघरी आरोग्य तपासणी झाल्यानंतर अतिशय कमी प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले आहेत तरीही नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.