कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन ६५ रुग्णांची शुक्रवारी नोंद झाली, तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, रुग्ण संख्या घटत असल्यामुळे स्थापन केलेली कोविड सेंटर्स पैकी पन्नास टक्के कोविड सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. मात्र तेथील सेटअप तसाच ठेवण्यात आला आहे. नवीन रुग्ण नसल्यामुळे हा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला.कोल्हापूर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. सध्या जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता १९५९ पर्यंत खाली आली आहे. त्यापैकी १२६२ रुग्ण आपल्या घरीच राहून उपचार घेत आहेत, तर केवळ ६९७ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण एकदमच कमी झाला आहे.शुक्रवारी जिल्ह्यात ६५ नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ७०८ वर गेली, तर ७५ रुग्ण कोरोनातून बरे झाल्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ हजार १२८ वर पोहचली आहे.पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडीतील ६० वर्षीय पुरुष, कोडोलीतील ५३ वर्षीय पुरुष, आजऱ्यातील भादवण गावची ६५ वर्षीय महिला तर सांगलीतील कलानगर येथील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. जिल्ह्यात मृत्यू होणाऱ्यांची संख्या १६२१ इतकी झाली आहे.कोल्हापुरात २२ नवीन रुग्ण सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या कोल्हापूर शहरात शुक्रवारी २२ नवीन रुग्ण आढळून आले. राधानगरी, शाहूवावाडी येथे प्रत्येकी एक, आजरा,भुदरगड, पन्हाळा तालुक्यात प्रत्येकी दोन, चंदगड तालुक्यात तीन करवीरमध्ये चार, शिरोळमध्ये पाच, हातकणंगले तालुक्यात नऊ रुग्णांची नोंद झाली. गगनबावडा व कागल येथे एकही रुग्ण आढळून आलेला नाही.पन्नास टक्के कोविड सेंटर्स बंद
कोरोनाचा संसर्ग जसा वाढत जाईल तसे विविध ठिकाणी जिल्हा व आरोग्य प्रशासनातर्फे ९६ कोविड सेंटर्स स्थापन केली होती. त्याचा चांगला उपयोग रुग्णांसाठी झाला. परंतू आता संसर्ग कमी होत असल्याने तसेच रुग्ण संख्या घटत असल्यामुळे त्यातील पन्नास टक्के सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.