कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी कोरोनाच्या ९२२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २८ व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध स्तरावर प्रयत्न करत असून, माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यास शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात आता ३५ हजार ५५२ वर रुग्ण, तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या १०८७ वर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांसह ॲंटिजेन टेस्टची संख्या वाढविण्यात आली आहे.
खासगी रुग्णालयांतूनही तपासण्या होऊ लागल्या आहेत. कोल्हापूर शहरात अकरा नागरी आरोग्य केंद्रांतून कोरोनाची तपासणी व स्वॅब घेण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे आज जरी रुग्ण संख्या वाढताना दिसत असली तरी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन साथीवर नियंत्रण मिळविता येईल, असा प्रशासनाचा दावा आहे.जिल्ह्यात कोरोनाची सर्वाधिक झळ कोल्हापूर शहराला बसली असून, तेथे ११ हजार ०१५ रुग्णांची नोंद झाली आहे. इचलकरंजी शहरात आतापर्यंत ३५९४ रुग्ण आढळून आले आहेत. या शहरी भागासह हातकणंगले तालुक्यात ३९९४, तर करवीर तालुक्यात ३८३१ रुग्ण आढळून आले आहेत. शिरोळ, कागल, पन्हाळा या तीन तालुक्यांनी रुग्ण संख्येचा हजाराचा आकडा पार केला आहे.