कोल्हापूर : बेकायदेशीर गॅस भरण्यासाठी जप्त करण्यात आलेल्या सिलिंडर देण्यात गॅस वितरकांचा सहभाग असल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिला.बुधवारी शहर वाहतूक शाखेचे पोलीस व पुरवठा विभागातर्फे बुधवारी शाहूपुरी कुंभार गल्ली व कदमवाडीतील सह्याद्री गृहनिर्माण संस्था परिसरात छापे टाकून बेकायदेशीर गॅस भरणाऱ्यांंचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये २७ सिलिंडरसह दोन रिक्षा व इतर साहित्यही पोलिसांनी जप्त करून सहाजणांना ताब्यात घेण्यात आले.
यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कवितके यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, बेकायदेशीर गॅस भरले जात असल्याची माहिती मिळाल्यावर तातडीने कारवाई सुरू आहे. बुधवारीही वाहतूक पोलीस व पुरवठा विभागातर्फे दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये २७ सिलिंडर जप्त करून संबंधितांविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुढील पोलीस तपासामध्ये सिलिंडर कुठून आली, हे समजेलच. यामध्ये गॅस वितरकांचा सहभाग आढळल्यास ती एजन्सी पुरवठा विभागाकडून तत्काळ सील केली जाईल. तसेच ती एजन्सी रद्द करण्याबाबत संबंधित गॅस कंपनीला प्रस्ताव पाठविला जाईल.