कोल्हापूर : कोरोना या जीवघेण्या विषाणूच्या प्रसाराबाबत महानगरपालिका, तसेच जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेली जनजागृती, प्रसार आणि प्रसिद्धी माध्यमातून मिळत असलेली भयावह माहिती यामुळे कोल्हापूर शहर परिसरात नागरिकांच्या मनात एक अनामिक धास्ती दिसून येत आहे.
शुक्रवारी संपूर्ण शहरात बंदसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. काही ठिकाणी व्यवसाय सुरू असले तरी ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला आहे. दुपारच्या सत्रात रस्ते ओस पडले होते.गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्याबाबत सुरू असलेली प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहता महानगरपालिका, तसेच जिल्हा प्रशासन यांनी राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत सामूहिक प्रयत्न कुठेही कमी दिसत नाहीत. मात्र, या प्रयत्नांंना जनतेचीही साथ मिळणे आवश्यक असल्याचे लक्षात येत आहे.
धान्य बाजार, भाजी मार्केट यांसारख्या काही ठिकाणी अजूनही लोकांची गर्दी होत असून, त्याला प्रतिबंध होणे अपेक्षित आहे.
शुक्रवारी सकाळी वाहतूक शाखेचे पोलीस शहरात फिरून दुकानदारांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते. जबरदस्ती नाही पण विनंती आहे, असे पोलीस सांगत होते. त्यामुळे दुकानदार दुकाने बंद ठेवायची की सुरू ठेवायची या विचारात होते.नागरिकांच्या मनातील भीतीमुळे शुक्रवारी शहरातील वातावरण अगदीच चिंता वाढविणारे होते. अंबाबाई मंदिर परिसर, तसेच या परिसरातील सर्व व्यवसाय बंद होते. नेहमी गजबजलेला भाऊसिंगजी रोड, ताराबाई रोड, चप्पल लाईन, महाद्वार, शिवाजी रोड, राजारामपुरी, शाहूपुरी परिसरातील दुकाने बंद होती.
शहरातील शुक्रवारचे चित्र
- सार्वजनिक बागा, चित्रपटगृहे बंद'
- शाळा, महाविद्यालये बंद
- अंबाबाई मंदिर, तुळजाभवानी मंदिर बंद
- चर्च, मस्जिद येथील प्रार्थना, नमाज बंद
- पानपट्टी, खाऊ गल्ली बंद
- मॉलमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंचीच विक्री
- अॅटोरिक्षांची तुरळक वाहतूक
- केएमटीच्या ६१ गाड्या बंद