विनोद सावंतकोल्हापूर : कोरोनाच्या महासंकटात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आधार ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांत १४७ रुग्णांवर या योजनेतून मोफत उपचार झाले आहेत. उपचारांसाठी आलेल्या सात लाख २० हजार १११ रुपये खर्चाला मान्यता मिळाली असून, लवकरच हीपण ही रक्कम संबंधित रुग्णालयाच्या खात्यावर जमा होणार आहे.कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यांच्यावर सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. राज्य शासनाने नुकताच कोरोना रुग्णांवरील उपचार महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेतून करण्यास मान्यता दिली आहे.जिल्ह्यामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी ४७ रुग्णालये पात्र आहेत. सीपीआर आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे या योजनेतून उपचार करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात सीपीआरमध्ये २११ आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १०६ रुग्णांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये सात लाख २० हजार १११ रुपयांचा परतावा लवकरच या रुग्णालयांना मिळणार आहे. उर्वरित १७० रुग्णांच्या प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.खर्चापेक्षा पॅकेज दर कमीमहात्मा फुले योजनेतून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी त्याच्या आजाराप्रमाणे पॅकेज ठरले आहेत. १५ हजारांपासून ८५ हजारांपर्यंत पॅकेज आहेत. यामध्ये काही खर्च जादा आणि पॅकेज कमी अशी आहेत. अतिदक्षता विभागात असणाऱ्या रुग्णाला पीपीई किट आणि औषधांचा खर्च जास्त आहे,अशा तक्रारी काही रुग्णालयांच्या आहेत. ह्यपीपीई किट आणि औषधे द्या; बाकी आम्ही मोफत उपचार देतो,ह्ण असेही काही रुग्णालयांचे मत आहे. त्यामुळे शासनाने पॅकेज दरात वाढ करणे अपेक्षित आहे.योजना असणाऱ्या ठरावीक रुग्णालयांतच उपचारमहात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना जिल्ह्यामध्ये ४७ रुग्णालयांत सुरू आहे. मात्र काही रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात नाहीत. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी तीन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयांना बेड आरक्षण ठेवण्यास सांगितल्यानंतर यामध्ये काही रुग्णालयांनी या आजारावर उपचार सुरू केला आहे. तरीही बहुतांश रुग्णालये कोरोना रुग्णावर योजना असतानाही उपचार देत नाहीत हे वास्तव आहे.
महात्मा फुले योजनेस पात्र रुग्णालये - ४७कोरोना उपचार सुरू असलेले रुग्णालय - १०पहिल्या टप्प्यात मंजुरीसाठी रुग्णांची पाठवलेले प्रस्ताव - ३१७योजनेत प्रस्ताव मंजूर झाले रुग्ण - १४७मंजूर झालेली रक्कम - ७ लाख २० हजार १११
महात्मा फुले आरोग्य योजनेतून पहिल्या टप्प्यात सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेल्या १४७ रुग्णांचा मोफत उपचार करण्यात आला आहे. उर्वरित ऑनलाइन अर्ज केले असून काहींची कागदपत्रे जमा नसल्यामुळे ते मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. योजनेमधून मोफत उपचार होण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड अथवा तहसीलदार, धान्यपुरवठा करणारे अधिकारी यांचे पत्र आवश्यक आहे. नंतर धावपळ होऊ नये यासाठी शक्यतो स्राव तपासायला जातानाच ही कागदपत्र सोबत नेणे गरजेचे आहे.- डॉ राजश्री चेंडके,जिल्हा समन्वयक, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना