कोल्हापूर : शहरातील खासगी रुग्णालयधारकांनी कोविड १९ रुग्णांवरील उपचारांसंदर्भात शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसार बिल आकारणी करावी, अन्यथा तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांतही उपचार सुरू करण्यात आलेले आहेत; परंतु शहरामध्ये खासगी रुग्णालये शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा जादा दर आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या रुग्णालयांच्या बिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी २१ अधिकाऱ्यांची यापूर्वी नियुक्ती केलेली आहे.
महापालिकेने यापूर्वी अशा रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांच्या नियंत्रणाखाली पथक नियुक्त केलेले आहे. या पथकाबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक रुग्णालयात बिल तपासणीसाठी लेखाधिकारी व वरिष्ठ लेखाधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे.रुग्णांना डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांचे बिल नियुक्त केलेल्या लेखाधिकाऱ्यामार्फत तपासणी करून घेऊन मगच रक्कम भरून घ्यावी अन्यथा संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल. तसेच शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी कोविड रुग्णांची बिले भरण्यापूर्वी ते लेखाधिकारी यांच्याकडून तपासून न घेता संबंधित रुग्णालयाने भरण्यासाठी तगादा लावल्यास महापालिकेच्या वॉर रूम फोन क्र. ०२३१ - २५४२६०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
शासनाच्या पोर्टलवर रुग्णालयाने रुग्णांची माहिती भरली नाही तर संबंधितावर कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे.