कोल्हापूर : अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचा गैरफायदा घेत कोल्हापूरकरांनी मंगळवारी पुन्हा एकदा बेजबाबदारपणाचे प्रदर्शन घडविले. ‘औषध आणायला निघालोय. डॉक्टरांकडे चाललोय, भाजी आणायला आलोय,’ असे सांगत अनेक नागरिकांनी भाजीमंडईत गर्दी केली; तसेच रस्त्यांवरून फेरफटका मारला. अखेर पोलिसांनी कडक भूमिका घेत विविध चौकांत अशा बेजबाबदार नागरिकांना ‘सरकारी पाहुणचार’ दिला. दरम्यान, औषध दुकाने, भाजी मंडई वगळता शहरातील सर्व व्यापारी पेठा, तेथील दुकाने कडकडीत बंद राहिली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांचे बेजबाबदारपणाचे लक्षण पाहून सोमवारी (दि. २३) दुपारी चारनंतर राज्यात संचारबंदी जाहीर केली. तिची तत्काळ अंमलबजावणीही सुरू झाली. मात्र या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा तसेच भाजीविक्री, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळली. त्याचाच गैरफायदा घेत मंगळवारी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अनेक नागरिक रस्त्यांवर उतरले. दुचाकीवरून अनेक तरुण केवळ संचारबंदी कशी असते, हे बघायला येत होते.ताराबाई रोडवरील कपिलतीर्थ, गंगावेशीतील पाडळकर मार्केट, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी नववी गल्ली येथील भाजी मार्केट सुरू होते. सकाळी भाजी विक्रेतेही आपला माल घेऊन बाजारात आले. त्याशिवाय न्यू महाद्वार रोड, राजारामपुरीतील अनेक गल्ल्यांत, रंकाळावेश बसस्थानक, ताराबाई रोड ते जॉकी बिल्डिंग, लक्ष्मीपुरी जयधवल बिल्डिंग परिसर येथेही भाजीविक्रेत्यांनी रस्त्यांवरच ठाण मांडले होते. काही फळविके्रेतेही रस्त्यांवर होते. त्यामुळे तेथे भाजीखरेदीकरिता सकाळच्या सत्रात गर्दी झाली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत तरी हेच चित्र दिसत होते.शहराच्या प्रत्येक प्रमुख रस्त्यावर, चौकाचौकांत पोलीस नाकाबंदी करून उभे होते. शिवाजी चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, जोतिबा रोड, मध्यवर्ती बसस्थानक, शाहू मिल चौक येथे तर पोलिसांनी दुचाकीस्वारांवर काठ्या उगारायला सुरुवात केली. सर्व दुचाकास्वारांना ‘तुम्ही रस्त्यांवर का आलाय?’ असे विचारत पोलीस चौकशी करीत होते. तो सहज फिरण्यासाठी आला आहे हे लक्षात आले की, पोलीस लाठीचा प्रसाद देऊन त्यांच्या दुचाकी ताब्यात घेत होते. प्रत्येक ठिकाणी के्रेन होत्या. दुचाकी ताब्यात घेतली की त्या के्रेनच्या साहाय्याने शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाकडे नेल्या जात होत्या.शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे या स्वत: मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुल कार्यालयासमोर थांबून उपनगरांतून येणारी सर्व वाहने अडवून त्यांची चौकशी करीत होत्या. त्यांनी अनेक दुुचाकी वाहने ताब्यात घेतली. नागरिकांच्या बेजबाबदार वृत्तीबद्दल त्या नागरिकांना खडसावत होत्या. ‘कोरोनाची साथ आहे. स्वत:ची काळजी घ्या, त्यासाठीच संचारबंदी लागू केली आहे, गांभीर्याने घ्या’ असे कट्टे नागरिकांना सांगत होत्या.संचारबंदीमुळे संपूर्ण शहर आज सलग चौथ्या दिवशी कडकडीत बंद राहिले. अनेक दुकानदार, कारखानदार दुकानाकडे फिरकलेच नाहीत. हॉटेल, रेस्टॉरंट, बिअर बार व परमिट रूम यांसह सर्वच व्यावसायिक संस्थांनी त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत सुट्ट्या दिल्या आहेत. संचारबंदीमुळे रस्ते ओस पडले आहेत.