कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती बिघडत चालल्यानंतर आपल्याच पंचक्रोशीतील रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची यातायात पाहिल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनीच कोरोना केअर सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे विरोधी गटातील जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम यांनी आपल्या गावामध्ये पहिल्यांदा असे सेंटर सुरू केले.माणगाव ग्रामपंचायत, वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने माणगाव येथे हे केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी १० ऑक्सिजन आणि ४० साध्या बेडची सुविधा करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम आणि माजी उपसरपंच राजू मगदूम यांच्या पुढाकारातून हे सेंटर या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे.
या पंचक्रोशीतील रूग्ण आणि संशयियांना या सेंटरचा चांगला फायदा होत आहे. ३० ऑगस्टला जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.जिल्हा परिषदेतील भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनीही अब्दुललाट येथे अशा पध्दतीचे कोविड सेंटर उभारण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. लाट येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हे सेंटर उभारण्यात येणार आहे.
५० बेडच्या या सेंटरमध्ये अधिकाधिक ऑक्सिजन बेड उभारण्यात येणार आहेत. स्थानिक १६ डॉक्टर नियोजन करून हे सेंटर चालविणार आहेत. जिल्हा परिषदेने यासाठी बेड, गादया, औषधे पाठवून दिली आहेत. दोन ते तीन दिवसांत हे सेंटर सुरू होणार आहे.जिल्हा परिषदेतील सत्तारूढ गटाचे पक्षप्रतोद उमेश आपटे यांनीही मुकुंदराव (दादा) आपटे फाउंडेशन आणि उत्तूर ग्रामस्थांच्या सहकार्याने केअर सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुमेवाडी येथील महापारेषण केंद्राची कर्मचारी निवासस्थाने रिकामी आहेत. अशा १३ क्वॉटर्स असून या ठिकाणी स्वतंत्र संडास, बाथरूमचीही व्यवस्था आहे. यासाठी परवानगी मागितली असून ती लवकरच मिळेल. त्यानंतर तातडीने या ठिकाणी सेंटरचे कामकाज सुरू होणार आहे.आधीच नियोजन आवश्यक होतेज्या पध्दतीने माणगावला सेंटर सुरू केले आहे तशी सेंटर्स आधीच सुरू व्हायला हवी होती. कारण गेल्या दोन महिन्यांपासून शासकीय केंद्रांवर मोठा ताण येत आहे. गावातीलच डॉक्टर्स एकत्र येऊन नियोजन करून हे सेंटर चालविणार असल्याने रूग्णांनाही फार वेगळे किंवा भीती वाटत नाही.