कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक कायम असून शुक्रवारी ८९१ नवीन रुग्ण आढळून आले, तर २६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या आता एक हजारावर गेली आहे.जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसागणिक अधिकच बिकट होत चालली असून आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोनाचा उद्रेक थांबत नाही आणि जनतेचेही फारसे सहकार्य मिळत नाही, अशा विचित्र परिस्थितीमुळे रुग्णांची संख्या तसेच मृत होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.शुक्रवारी सायंकाळी संपलेल्या चोवीस तासांत नवीन ८९१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३३ हजार १११ वर गेली, तर २६ जणांच्या मृत्यूमुळे कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या १०११ वर गेली. अवघ्या दोन अडीच महिन्यांत इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने रुग्णांवर उपचार करणे एक आव्हान बनले आहे.
कोल्हापुरातील आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असूनही त्यांच्या या प्रयत्नांना यश येत नाही. कोरोनाची साखळी तोडण्यात जनतेचा पुढाकार आता महत्त्वाचा वाटू लागला आहे.