समीर देशपांडे कोल्हापूर : केवळ १० दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १३५७ कोरोनाचे रुग्ण वाढले असून, हा कहर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच येणारे १५ दिवस कोल्हापूरकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ११ ते २१ जुलै या १० दिवसांमधील या वाढत्या रुग्णसंख्येने रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा ४० दिवसांवरून केवळ आठ दिवसांवर आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर आता घरांतूच उपचार करण्याचा पर्यायावर गंभीरपणे विचार सुरू झाला आहे. पुणे, पणजीमध्ये असा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.या १० दिवसांमध्ये तीन दिवस रुग्णसंख्येने २०० पेक्षा अधिक मजल मारली. १७ जुलै रोजी तर हा उच्चांकी आकडा तब्बल २९३ वर गेला. यातील दोन दिवस रुग्णसंख्या ही दीडशेपेक्षा जास्त झाली. उर्वरित चार दिवस हा आकडा ५० च्या वर राहिला. केवळ एकच दिवस हा आकडा ५० च्या आत म्हणजे ४७ राहिला. या १० दिवसांमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.याच पद्धतीने आपण १८ जून ते १८ जुलै या एका महिन्याचा आढावा घेतला तर परिस्थिती कशी बदलली हे आपल्या लक्षात येते. जून महिन्यातील १८ तारखेला जिल्ह्यामध्ये कोरोनाचे केवळ ७२८ रुग्ण होते; तर त्यांतील ६६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे केवळ ५२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते.
यानंतर ही संख्या खाली येत एक वेळ अशी आली की, केवळ ३६ रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र जुलै महिन्यामध्ये या परिस्थितीमध्ये मोठा फरक पडत गेला. १० जुलैपर्यंत त्यातही परिस्थिती आणखी नियंत्रणामध्ये होती. मात्र त्यानंतर रुग्ण दुप्पट होण्याचा वेग जो ४० दिवसांवर गेला होता, तो एकदम आठ दिवसांवर आला आणि रोज शेकडोंनी कोरोना पॉझिटिव्ह नागरिक येऊ लागले.जुलै महिन्याच्या १८ तारखेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा केवळ एका महिन्यात परिस्थिती झपाट्याने बदलल्याचे दिसून येते. या दिवशी जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २०९२ इतकी नोंदवण्यात आली. म्हणजेच केवळ एका महिन्यात १३६६ रुग्ण वाढले. त्यातील ९८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. म्हणजेच महिन्याभरात केवळ ३१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
जून महिन्यात ज्या तारखेला केवळ ५२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू होते, त्याच तारखेला जुलै महिन्यामध्ये १०१० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू होते. १८ जून रोजी केवळ आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता; तर १८ जुलै रोजी हाच आकडा ४६ वर पोहोचला. म्हणजे केवळ महिन्याभरामध्ये ३८ रुग्णांचा मृत्यू झाला.आता घरात उपचार करण्याची येणार वेळमुंबई, पुण्यामध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच असल्यामुळे अखेर ज्यांच्या घरामध्ये स्वतंत्र खोली आहे, अशा ठिकाणी घरातच उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कारण तेथे रुग्णांच्या वाढत्या प्रमाणामध्ये रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत. खासगी रुग्णालयांची बिले परवडणारी नाहीत. त्यामुळे ही संख्या अशीच वाढत राहिली तर कोल्हापुरातही हीच पद्धत अवलंबवावी लागणार आहे.हॉटेलमध्ये उपचार सुरूकोल्हापुरातही सध्या सीपीआर, डी. वाय. पाटील रुग्णालयांसह अनेक ठिकाणी खाटा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला हॉटेलमध्ये ठेवून तेथे ठरावीक रुग्णालयांच्या वतीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. अर्थात हॉटेल आणि रुग्णालय यांचा खर्च संबंधित रुग्णाला करावा लागणार आहे.आणखी ३५ ठिकाणी होणार उपचारवाढती रुग्णसंख्या आणि अपुऱ्या पडणाऱ्या खाटा यांचा विचार करता जिल्ह्यात आणखी ३५ ठिकाणी कोरोनाचे उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या उपाययोजनांचा व्हीसीच्या माध्यमातून आढावा घेतला. सध्या जिल्ह्यात १४ ठिकाणी असे उपचार सुरू असून आणखी ३५ ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी ऑक्सिजनपासून सर्व ती यंत्रणा उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गरम पाण्याची सोय हवीसीपीआर रुग्णालयासह काही ठिकाणी अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय नसल्याची तक्रार तेथे असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांकडून करण्यात आली आहे. वास्तविक एकीकडे अंगात ताप, सर्दी, खोकला असेल आणि अशात जर अंघोळीसाठी गरम पाणी मिळणार नसेल तर हा आजार बळावण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी गरम पाण्याची सोय नाही तेथे ती तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज आहे.दहा दिवसांतील रुग्णसंख्यादिनांक रुग्णसंख्या मृत्यू
- ११ जुलै ४७ ००
- १२ जुलै ६४
- १३ जुलै ७१ ०४
- १४ जुलै ६९ ०७
- १५ जुलै १५५ ०४
- १६ जुलै ७७ ०५
- १७ जुलै २९३ ०३
- १८ जुलै २०५ ०३
- १९ जुलै १६६ ०९
- २० जुलै २१० ०६
- एकूण १३५७ ४१