कोल्हापूर : कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात आलेल्या कोरोना चाचणी लॅबोरेटरीमधील किट्स संपल्यामुळे गुरुवार (दि. ३०) व शुक्रवार असे दोन दिवस कोरोना चाचणी करण्यावर बऱ्याच मर्यादा आल्या. रोज एक हजार ते बाराशे स्रावांची चाचणी होत असे; परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्या ४०० पर्यंत खाली आल्या. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत आठ कोरोनाबाधित रुग्ण दगावले, तर नवीन ७० रुग्ण आढळून आले.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला असून, लॅबोरेटरीमध्ये स्रावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा महत्त्वाच्या वेळी शेंडा पार्क येथील लॅबोरेटरीमधील एक यंत्र केवळ किट्स उपलब्ध न झाल्यामुळे बंद ठेवावे लागले.
सध्या लॅबोरेटरीमध्ये सेमी ऑटोमॅटिक व फुल्ली ऑटोमॅटिक अशी दोन यंत्रे आहेत. त्यांपैकी फुल्ली ऑटोमॅटिक यंत्र किटस्अभावी बंद ठेवावे लागले, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. ठेकेदाराकडून किटस्चा वेळेवर पुरवठा न झाल्यामुळे ही नामुष्की ओढावली.लॅबमधील दोन यंत्रांवर रोज सरासरी एक हजार ते १२०० स्रावांची तपासणी होत होती. परंतु गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस एक यंत्र बंद ठेवावे लागल्यामुळे केवळ ४०० तपासण्या झाल्या. त्यामुळे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही एकदम कमी झाले. लॅबोरेटरीकडे एक जादा यंत्र आले असून ते जोडण्याचे काम सुरू होते. शनिवारपासून हे नवीन यंत्र कार्यान्वित होईल, असे सांगण्यात आले.दरम्यान, गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत ५० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले; तर शुक्रवारी सायंकाळपर्यंत २० रुग्ण आढळून आले. मात्र २४ तासांत जिल्ह्यातील आठ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.
दोन रुग्ण सीपीआरमध्ये, एक रुग्ण आयजीएम, इचलकरंजी रुग्णालयात; तर पाच रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत झाले. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता १७६ वर जाऊन पोहोचली. एकूण रुग्णसंख्या ६१४५ वर गेली असून, त्यापैकी ३४३५ रुग्ण उपचार घेत आहेत.