कोल्हापूर : शहरातील गर्दीची ठिकाणे असलेल्या भाजी मंडईतील विक्रेते, रस्त्यांवरील फेरीवाले, धान्य बाजारातील दुकानदार यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी कपिलतीर्थ भाजी मंडईतील जवळपास २१७ जणांचे स्राव घेण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने हा उपक्रम राबविला आहे.कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली असून, त्याचा संसर्ग रोखण्यात महानगरपालिका प्रशासनाला प्रयत्न करूनही यश आलेले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महापालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या बैठकीत शहरातील गर्दीच्या ठिकाणी बसणारे विक्रेते, फेरीवाले तसेच धान्य दुकानदार यांची कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय झाला होता.त्यानुसार या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी कपिलतीर्थ भाजी मंडई येथील भाजी विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. मंडईतील भास्करराव जाधव वाचनालयाच्या जुन्या इमारतीत ही तपासणी करण्यात आली. २१७ विक्रेत्यांची तपासणी झाली. त्यामध्ये पहिल्या ५० ॲन्टिजेन तपासण्या करण्यात आल्या.
त्यामध्ये दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे त्या बाधित व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती गटनेते अजित ठाणेकर यांनी सांगितली. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.या तपासणी वेळी महापालिकेतील भाजपचे गटनेते अजित ठाणेकर, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख पंडित पोवार, मार्केट विभागाच्या आरोग्य निरीक्षक गीता लखन यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.