कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचे संकट अधिकच तीव्र होताना दिसत आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत केवळ बारा तासात जिल्ह्यांत २०० नवे रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह प्रशासनही अवाक झाले आहे.
कोल्हापूर शहरासह प्रमुख व्यापारपेठ असलेल्या इचलकरंजी, गांधीनगर तसेच शाहूवाडी व हातकणंगले, करवीर तालुक्यांतील काही गावे समूह संसर्गाच्या मार्गाने वाटचाल करत असल्याचे शुक्रवारी समोर आलेल्या कोरोना रुग्णांच्या आकड्यावर दिसत आहे. इचलकरंजी शहरात एका दिवसात एकूण ५४ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील हातकणंगले, करवीर, शाहूवाडी तालुके कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. रुग्णांची वाढत चाललेली ही संख्या पाहता कोरोनाचा संसर्ग रोखण्यास स्थानिक प्रशासनास अपयश येत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.शुक्रवारी कोरोनाचे अहवाल जसे बाहेर यायला लागले, तसे हातकणंगले तालुक्यात ५४, चंदगड तालुक्यात २४, शाहूवाडी तालुक्यात अकरा, पन्हाळा तालुक्यात बारा, करवीर तालुक्यात ३२, गडहिंग्जल तालुक्यातील पाचजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा हा आकडा २०० च्या पुढे गेला होता. जिल्ह्यात आता एकूण रुग्णसंख्या १७४७ पर्यंत जाऊन पोहोचली.