कोल्हापूर : परदेशातून आलेल्या लोकांची यादी सोशल मीडियावर प्रसारित करून ते ‘कोरोना पॉझिटिव्ह’ असल्याचा अप्प्रचार केला जात आहे. ही बाब गंभीर असून, अशी यादी प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी दिला.परदेशातून आलेल्या नागरिकांची यादी प्रसारित करून ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अप्प्रचार सोशल मीडियावरून सुरू आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक देशमुख यांना विचारणा केली असता ते म्हणाले, कोरोनाबाधित विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच अनेक संदेश सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
परदेशातून आलेल्या व कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या काही लोकांची यादी सोशल मीडियावर प्रसारित केली जात आहे. त्यामध्ये हे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अप्प्रचार केला जात आहे. परंतु आपल्याकडे कोरोना पॉझिटिव्हचा कोणताही रुग्ण नाही.
जे परदेशातून आले आहेत त्यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. तरीही त्यांना सक्तीने होम कोरोंटाईनच्या सूचना दिल्या आहेत. परंतु त्यांच्याबद्दल ‘कोरोना’बाधित रुग्ण असल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरविली जात आहे. अशी चुकीची अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.