कोल्हापूर : सीपीआर परिसरात लावलेला बंदोबस्त पाहण्यासाठी आलेले जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्यासमोरच वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये मतभेद उफाळून आले.सीपीआरमध्ये ज्या ठिकाणी कोरोना तपासणीसाठी केंद्र करण्यात आले आहे, त्या बाजूला इतर रुग्णांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या विभागाच्या दोन्ही बाजूला अडथळे लावून वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी दुपारी डॉ. अभिनव देशमुख बंदोबस्त पाहण्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना निरोप दिला. त्यांच्यासह महेंद्र बनसोडे व इतर डॉक्टर देशमुख यांच्याशी चर्चा करीत होते. या ठिकाणी नेमक्या कोणाला प्रवेश आहे किंवा नाही याचा स्पष्ट फलक लावण्याची सूचना देशमुख यांनी यावेळी डॉ. गजभिये यांना केली.दरम्यान, डॉ. देशमुख आल्याचा निरोप शिपायांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांना दिला. लगेचच डॉ. केम्पीपाटील, डॉ. विलास देशमुख, डॉ. हर्षला वेदक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे आले.यावेळी गजभिये म्हणाल्या, सीपीआरकडे तपासण्यासाठी बहुतांशी रुग्ण येतात. त्यांची विभागणी करून त्यांना इतरही केंद्रांवर पाठविण्याची गरज आहे. त्यामुळे येथील यंत्रणेवरील ताण कमी होईल, असा दावा त्यांनी केला. मात्र, त्यांच्यासमोरच केम्पीपाटील यांनी खंडन केले. ते म्हणाले, ‘कोण, कुणाला, कुठे सांगणार तपासायला जा म्हणून. त्यांना सीपीआरलाच तपासायला जायचे असेल तर आम्ही दुसरीकडे जावा म्हणून सांगू शकत नाही.’ यावर डॉ. देशमुख म्हणाले, सीपीआरवर लोकांचा विश्वास आहे. तुम्ही सर्वजण चांगले काम करीत आहात म्हणूनच नागरिक तपासण्यासाठी इकडे येत आहेत. तुम्ही फक्त या ठिकाणी फलक लावा म्हणजे पोलिसांनाही या ठिकाणी नीट बंदोबस्त करता येईल.