कोल्हापूर : शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि मृत्युदर कमी करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. हायरिस्क, व्याधीग्रस्त आणि संशयितांसाठी उपाययोजनांचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करून नियोजनबद्ध काम करा, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.महानगरपालिकेच्यावतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनेबाबत अजिंक्यतारा येथे महापालिका, पदाधिकारी व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, प्राथमिक शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, गटनेते शारगंधर देशमुख यांची प्रमुख उपस्थित होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, फिल्डवरील यंत्रणेला येणारे अनुभव आणि अडचणी यांचा अभ्यास करून कोरोनाची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तपासणी, निदान आणि उपचार याबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा अभ्यास करून व्यक्तीनिहाय डेटा संकलित करावा.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या बिलांची तपासणी करून योग्य तेच बिल देण्याबाबत महापालिकेने ऑडिटरांची स्वतंत्र विंग तयार केली आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम अधिक प्रभावी राबवून लोकजागृतीची लोकचळवळ उभी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.मृत्युदर शून्यावर आणाकोरोनाचा मृत्युदर शून्यावर आणणे महत्त्वाचे असून यासाठी अधिकाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे गरजेचे आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे हायरिस्क, व्याधीग्रस्त आणि संशयितांची तपासणी होऊन निदान लवकर होईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.हॉटस्पॉटमध्ये यंत्रणा अधिक दक्ष ठेवाकोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी महापालिका यंत्रणेने अधिक दक्षता घेऊन उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करावे. यामध्ये कॉलनीनिहाय, गल्लीनिहाय आणि अपार्टमेंटनिहाय नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.पालकमंत्र्यांच्या सूचना
- होम टू होम सर्व्हे करताना एकही व्यक्ती सुटता कामा नये
- कोरोनामुळे मृत झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पाठपुरावा करू.
- हायरिस्क, संशयित आणि लक्षणे दिसणाऱ्या लोकांचे स्वॅब तपासणीसाठी यंत्रणा सक्षम करा.
- होम आयसोलेशन असणाऱ्या जवळपास ६८५ व्यक्तींची माहिती संबंधित पोलीस ठाण्यास देऊन त्यांच्यामार्फतही मॉनिटरींग करा.
- होम टू होम सर्व्हेमध्ये लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करून घ्या.