कोल्हापूर : देवकर पाणंद परिसरातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह झाली. यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेतली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले तर चार महिन्यांच्या बाळाचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला. त्याला दसरा चौकातील जैन बोर्डिंग येथील व्हाईट आर्मीच्या कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले.
लहान बाळासाठी त्याचे इतर कुटुंबीय सेंटरमध्ये दाखल झाले. १४ दिवसांच्या उपचारानंतर रविवारी बाळ कोरोनामु्क्त झाले असून कुटुंबीयासह घरी गेले. देवकर पाणंदमध्ये एका कुटुंबातील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारासाठी अनेक खासगी दवाखाने फिरले तरी कोणी उपचारास घेतले नाही.
अखेर दसरा चौकातील जैन बोर्डिंगच्या कोरोना सेंटरमध्ये त्यांना उपचारार्थ दाखल केले. कुटुंबातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले; तर चार महिन्यांच्या बाळाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे घरातील सर्वांच्या पायांखालची जमीन सरकली. काय करो कळेनासे झाले. आईचे अश्रू अनावर झाले. बाळाला कुठे ठेवावे, उपचार कुठे करावेत कळेना. अखेर संपूर्ण कुटुंबाने चार महिन्यांच्या बाळासोबत व्हाईट आर्मीचे जैन बोर्डिंग येथील कोरोना सेंटर गाठले.चौघेही एकाच रूममध्येव्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्याशी चर्चा करुन पॉझिटिव्ह आजी, बाळासह सर्व कुटुंब येथील एकाच रूममध्ये राहिले. सुरुवातीला चार महिन्यांच्या बाळाला ताप, सर्दी, खोकला सुरू होता. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांच्यामार्फत त्याच्यासाठी ऑनलाइन उपचार पद्धत सुरू करण्यात आली. १४ दिवसांनंतर रविवारी बाळ आणि आजी कोरोनामुक्त झाले. डॉ. अमोल कोडोलीकर, हिना यादवाड, अरविंद लवटे, विनायक भाट, सिद्धेश पाटील, अशोक कुरुंदकर त्यांच्या मदतीला धावले.