किणी/कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस व प्रशासनाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकंणगले ) येथील टोल नाक्यावर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणारे पुण्या-मुंबईकडील वाहने अडविण्यात आली होती. यामधील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून होम कोरोंटाईन'चे शिक्के मारून सोडण्यात येते होते. महामार्गावर वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. सोमवारी लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतर महामार्गावर वाहनधारकांची संख्या वाढत असल्याने जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी दहा वाजलेपासून जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा जिल्ह्यात प्रवेश करणारी सर्व वाहनधारकांना बॅरॅकेटस लावुन अडविण्यात आली.यामध्ये मोटरसायकल, कार, जीप, खासगी प्रवाशी वाहनांसह माल वाहतुक करणाऱ्या वाहनधारकांचा समावेश होता. या वाहनांच्या रांगा लांबच्या लांब लागल्या होत्या. या वाहनधारकांना सुचना देऊन टोल नाक्या शेजारी उभारलेल्या आरोग्य विभागाच्या तपासणी केंद्रावर थांबवून त्यातील प्रवाशांना भादोले आरोग्य केंद्रांतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अमोल नरदे, डॉ. ऐश्वर्या सिद, वर्षा पाटील, निमा तडवी यांचेसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे तपासणी केली जात होती.
त्यानंतर आलेल्या सर्व प्रवाशांच्या हातावर 'होम कोरोंटाईन' चे शिक्के मारून त्यांना घरीच राहण्याच्या सूचना देऊन सोडण्यात येत होते. तपासणी करुनच जाण्यासाठी पोलिस सर्व खबरदारी घेत होते. यावेळी वडगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदिप काळे, सीताराम डुबल, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार आदी बंदोबस्तासाठी तैनात होते. दरम्यान, निवास मार्ग सुरु आहे पण कागल - गारगोटी मार्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बिद्री येथे बंद करण्यात आला आहे.