कोल्हापूर : जिल्ह्यातील हॉटेल्सची खाद्यपदार्थांची पार्सल सेवा शुक्रवारपासून पुन्हा सुरू झाली. जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन केल्यापासून गेले दोन आठवडे ही सेवा बंद होती. मात्र पुन्हा व्यवसाय सुरू झाल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोनामुळे तीन महिने हॉटेल व्यवसाय बंद होता. मात्र गेल्या महिन्याभरापासून हॉटेल्सना जेवण पार्सलद्वारे देण्याची परवानगी मिळाल्याने सगळीकडे ही सेवा सुरू होती. कोल्हापुरात गेल्या १५-२० दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने २० ते २६ तारखेदरम्यान १०० टक्के लॉकडाऊन जाहीर केले.
त्यानंतर नियम व अटींच्या अधीन राहून व्यवसायांना परवानगी देण्यात आली. मात्र त्यात हॉटेल्सचा समावेश नव्हता. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून हॉटेल्स पुन्हा बंद होती. याबाबत व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचीही भेट घेतली होती.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशात हॉटेल्सचा समावेश केला जाईल असे सांगितले. दरम्यान, आज १ ऑगस्टपासून पुन्हा अनलॉक सुरू झाले असून त्यानुसार हॉटेल व्यावसायिकांना पार्सलची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याआधी शुक्रवारपासूनच हॉटेल्सनी ही सेवा सुरू केली आहे.
जिल्ह्यात सगळे व्यवसाय सुरू असताना हॉटेल्सची पार्सल सेवा पुन्हा का बंद केली गेली माहीत नाही; पण आता नव्या आदेशानुसार परवानगी मिळाल्याने हॉटेल्समधील पार्सल सेवा सुरू होत आहे.- आनंद माने (व्यावसायिक)