कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट असणाऱ्या शिवाजी पेठ, राजारामपुरी परिसरात घर ते घर सर्वेक्षण मोहीम रविवार पासून सुरू करण्यात आली. दिवसभरात आठ प्रभागांतील १४ लोकांना कोरोनासदृश लक्षणे असल्याचे दिसून आले. त्यांना आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले.शहरांमध्ये राजारामपुरी आणि शिवाजी पेठ या परिसरांत कोरोनाचे रुग्ण रोज मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. हे दोन्ही परिसर हॉट स्पॉट बनले आहेत, याची गंभीर दखल पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली. त्यांनी या दोन्ही परिसरांत घर ते घर तपासणी करण्याचे आदेश महापालिकेला दिले.
संपूर्ण विभाग एकाच वेळी या दोन्ही परिसरांत सर्वेक्षण करून संबंधितांना उपचार करण्यास पाठवले जाईल, अशाही त्यांनी सूचना केल्या. यामुळे कोरोना रुग्ण तत्काळ आढळून येऊन त्याच्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही, हा यामागील उद्देश आहे.
यानुसार गांधी मैदान विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता रमेश मस्कर, राजारामपुरी विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांनी रविवारी घर ते घर ताप आणि ऑक्सिजन तपासणीची मोहीम राबवली.५९२५ लोकांची तपासणीराजारामपुरीमध्ये १२७७ घरांमधील ४४९० लोकांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये प्रभाग क्रमांक २४, ३६, ३७, ३८, ३९ यांचा समावेश आहे. यामध्ये तीन लोक कोरोनासदृश्य लक्षणे असणारे आढळून आले. शिवाजी पेठेमध्ये प्रभाग क्रमांक ५६, प्रभाग क्रमांक ५७, प्रभाग क्रमांक ६९ येथील १४३५ लोकांची तपासणी केली यामध्ये ११ लोकांना कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आली.