कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठातील प्रशासकीय आणि अधिविभागांतील काम शुक्रवारपासून सुरू झाले. वर्ग भरत नसल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. त्यातच ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने विद्यापीठ परिसरातील शुकशुकाटामध्ये अधिकच भर पडली आहे.कोरोनाबाबत दक्षता म्हणून राज्य सरकारने सर्व शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी ५० टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी विद्यापीठात शुक्रवारपासून सुरू झाली.
५० टक्के उपस्थितीबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने गुरुवारी (दि. १९) सायंकाळी काढले. त्यावर काही विभागप्रमुखांनी त्याची माहिती कर्मचाºयांना व्हॉट्स अॅपद्वारे दिली. मात्र, ज्यांना माहिती मिळाली नाही, असे बहुतांशजण कामावर उपस्थित राहिले. त्यामुळे साधारणत: ७० टक्के कर्मचारी उपस्थित होते. शनिवारपासून कर्मचारी उपस्थितीची संख्या आणखी कमी होईल.