कोल्हापूर : सकाळी घरात येणाऱ्या दुधाच्या पिशवीद्वारे कोरोना विषाणू संसर्ग होण्याची वर्तविली जाणारी शक्यता अनाठायी असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी पत्रकातून दिली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून दुधाची पिशवी आणि कोरोना विषाणूबाबत गैरसमज पसरविले जात असून याबाबत ‘गोकुळ’द्वारे सर्वप्रकारची काळजी घेऊनच दूध पिशव्यांचे वितरण केले जाते, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.‘गोकुळ’ दूध संघ नेहमीच स्वच्छता व शुद्धतेला प्राधान्य देत आहे तरीही कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दूध संकलनापासून घरपोच सेवेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर संघाकडून पुरेशी आणि अधिक काळजी घेतली जात आहे.
या प्रक्रियेतील सर्व घटकांना मास्क व सॅनिटायजर पुरविण्यात आलेले आहेत आणि त्याचा वापर सक्तीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत तरीही काही संशय असल्यास पिशवी हाताळल्यानंतर साबणाने २० सेकंद हात स्वच्छ धुवावेत, त्यानंतर संसर्ग होण्याचा धोका कमी होतो, असेही अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी पत्रकात म्हटले आहे.