कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यात मुंबई, केरळच्या धर्तीवर राबवलेला कोरोना मुक्तीचा पॅटर्न दिशादर्शक ठरणार आहे. गंभीर परिस्थितीपूर्वीच घरोघरी स्क्रीनिंग करून त्यावर तत्काळ उपचार होणार असल्याने कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी निश्चितच उपयुक्त आहे.केरळ, दिल्ली व मुंबई मध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता. तिथे आरोग्य विभागाने ज्या पद्धतीने परिस्थिती नियंत्रणात आणली, त्याच पद्धतीने कागल विधानसभा मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ यांनी घरोघरी स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मतदारसंघांतील १२६ ग्रामपंचायतींकडे ऑक्सिमीटर्स व थर्मल स्कॅनर मशिन्स दिले आहेत.
ग्रामदक्षता समित्या, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कृषी, शिक्षण, आरोग्य विभाग, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून एक दिवसाच्या बालकापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे.
दर पंधरवड्याला प्रत्येक नागरिकाचे स्क्रीनिंग होणार असल्याने गंभीर परिस्थितीपूर्वीच उपचार होणार आहे. तपासणीमध्ये नियमांपेक्षा वेगळी लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू होणार आहेत. त्यामुळे पुढे लक्षणे वाढवण्यापूर्वीच त्याला आळा घालण्यात यश येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, सेवाभावी व सामाजिक संघटनांनी अशा प्रकारे व्यापक मोहीम राबविली तर जिल्हा कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.कसे असावे प्रमाण :
- ऑक्सीमीटर्स (रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण) - नियमित (योग्य) : ९५ युनिट. ९४ युनिटपेक्षा कमी असल्यास धोकादायक.
- फारनेट (अंगातील तापमानाचे प्रमाण ) - नियमित (योग्य) : ९८ अंश सेल्सिअस. १०० अंश सेल्सिअस झाल्यास धोकादायक.
कागल मतदारसंघात असे झाले वाटप :कागल व गडहिंग्लज शहर प्रत्येकी (२०० ऑक्सिमीटर व २०० थर्मल स्कॅनर), कागल तालुका ग्रामीण भाग (२५० ऑक्सिमीटर व २५० थर्मल स्कॅनर). कडगाव कौलगे व उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातही दिली जाणार आहेत.