कोल्हापूर : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था करा. त्याचबरोबर ज्यांना घरी अलगीकरण होण्याची व्यवस्था नाही अशांनाही संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी येथे दिले.‘सीपीआर’ कक्षाला वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी भेट देऊन माहिती घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या उपाययोजनांसंसर्भात प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील आदी उपस्थित होते.तपासणी नाक्यांवर तसेच विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची काटेकोर तपासणी करा, सर्वांनी सतर्क राहून जबाबदारी पूर्ण करा, ज्यांना घरीच अलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांची तपासणी करा, सीपीआरमध्ये येणाया प्रवाशांची सविस्तर माहिती घेवून त्यांची तपासणी करावी. अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी वेळोवेळी येथील कक्षाला भेट देवून माहिती घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.