कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षामध्ये ५२ नागरिकांना ठेवण्यात आले.
यामध्ये शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रातील अलगीकरण कक्षामध्ये ३० नागरिकांचे अलगीकरण करण्यात आले आहे. तर अंडी उबवणी केंद्र येथे एका नागरिकाला अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांना चौदा दिवस तेथे ठेवले जाणार आहे.जगभरातील कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका स्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत. आयुक्त कलशेट्टी यांनी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेब कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत एकूण घर टू घर सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.होमक्वारंटाईन नागरिकांचा दैनंदिन पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे काम करताना स्वत:चीही काळजी घ्यावी, असे सांगितले.होमक्वारंटाईन नागरिकांनी चौदा दिवस घरीच थांबावे, घराबाहेर पडू नये, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन आयुक्त कलशेट्टी यांनी केले आहे.