कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात सोमवारी प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यास मोठा दिलासा मिळाला. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात नीचांकी ७३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर आठजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ३८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. विशेष म्हणजे तीन तालुक्यांत एकही नवीन रुग्ण नाही. सात तालुक्यांत पाचच्या आतच नवीन रुग्ण आहे.गेल्या चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत राहिला होता, परंतु ऑक्टोबर महिन्यात रुग्ण वाढीचा आलेख खाली झुकला. मागच्या चार महिन्यांच्या तुलनेत संसर्गाच्या बाबतीत ऑक्टोबर महिन्यात कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला, तर मागच्या दहा दिवसांत प्रथमच ७३ इतक्या नीचांकी संख्येने सोमवारी नवीन रुग्णांची नोंद झाली. कोल्हापूकरांना हा मोठा दिलासा आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ४६ हजार ८८१ इतकी झाली असून, मृतांची संख्या १५५८ झाली आहे, तर आतापर्यंत सुमारे ४१ हजार १५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णांची संख्या अशीच कमी होत राहिली तर येत्या काही दिवसांतच कोल्हापूर कोरोनामुक्त होईल.तीन तालुक्यांत एकही रुग्ण नाहीआजरा, गगनबावडा व शिरोळ या तीन तालुक्यांत मागच्या चोवीस तासांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही. भुदरगड, गडहिंग्लज तालुक्यांत प्रत्येकी दोन, चंदगडमध्ये तीन, कागल, पन्हाळा, राधानगरी तालुक्यांत प्रत्येकी चार, शाहूवाडी तालुक्यात एक, हातकणंगलेत आठ, करवीर तालुक्यात सात नवीन रुग्ण आढळून आले.मृतांमध्ये पाच महिला, तीन पुरुषांचा समावेशचोवीस तासांत आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये पाच महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. मृत झालेल्यांमध्ये कोल्हापूर शहरातील सुभाषनगर, संभाजीनगर, आजऱ्यातील भादवण, गगनबावड्यातील शेणवडे तर आंबोली - सावंतवाडी, कुडाळ, नातेपुते- सोलापूर, तांबवे- सांगली येथील रुग्ण उपचार सुरू असताना मृत झाले.
चाचण्यांची संख्या घटली कोरोना संसर्ग कमी झाल्याने चाचण्यांची संख्याही घटली आहे. मागच्या चोवीस तासांत आरटीपीसीआर, ॲन्टीजेन व खासगी रुग्णालयात मिळून ७४९ चाचण्या झाल्या.तालुकानिहाय रुग्ण संख्या आजरा - ८१९, भुदरगड - ११७७, चंदगड - ११२१, गडहिंग्लज - १३४२, गगनबावडा - १३२, हातकणंगले - ५०९७, कागल - १६०१, करवीर - ५४१८, पन्हाळा - १७९९, राधानगरी - ११९९, शाहूवाडी - १२५१, शिरोळ - २४०१, नगरपालिका हद्द - ७२२२, कोल्हापूर शहर - १४,१९५, इतर जिल्हा - २१०७.
- एकूण रुग्ण - ४६,८८१
- कोरोनामुक्त - ४१,१५४
- एकूण मृत - १५५८
- उपचार घेणारे रुग्ण - ४१६९.