कोल्हापूर : येथील सीपीआर रूग्णालयातील 20 हजार लीटर लिक्वीड ऑक्सिजन टँकनंतर काल इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात 6 हजार लीटरचा लिक्वीड ऑक्सिजन टँक बसवण्यात आला आहे. दिवसाला 200 हून अधिक रूग्णांच्या ऑक्सिजनची सोय झाली असून शनिवारपर्यंत हा टँक कार्यान्वित होणार आहे.कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तात्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युध्दपातळीवर निर्णय घेवून जिल्हा नियोजन समितीमधून सीपीआरसाठी 20 हजार लिटरच्या तसेच इचलकरंजी येथील आयजीएमसाठी 6 हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन टँक व तद्अनुषंगे कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला व त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली काम पूर्ण करण्यात आले.17 फूट उंच, 2 फूट व्यास असलेला हा लिक्विड ऑक्सिजन टँक काल बसविण्यात आला. यासोबतच 200 क्युबिक मीटर प्रती तास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. 6 हजार लीटर क्षमतेचा हा टँक असून यातील 1 लीटर द्रवापासून 850 लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे. या टँकमधून आयजीएम रूग्णालयात असणाऱ्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल.
तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजनची सुविधा देण्यात येत आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा टँक बसविण्यात आला.या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने हे नियंत्रण अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा टँक बसविण्यासाठी कोल्हापूर ऑक्सिजन लिमीटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गाढवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपअभियंता बी.एल.हजारे, शाखा अभियंता सतीश शिंदे, बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे, विनोद खोंद्रे यांचे पथक कार्यरत आहे.