कोल्हापूर : शहरात कोरोना महामारीचा अक्षरश: कहर सुरू आहे. दिवसाकाठी पाचशे ते हजार लोक बाधित होत असून, त्यातून मृत्यूचे प्रमाणही धक्कादायक आहे. तरीसुद्धा अनेकजण विनामास्क, तर काहीजण हनुवटीला मास्क लावून फिरत आहेत; त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू लागला आहे.राज्य व केंद्र सरकारने अन्लॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर नागरिकांना अनेक सवलती दिल्या. दुकाने, मॉल पूर्णपणे सुरू झाले आहेत. प्रवास करण्यावरील बंदी हटविण्यात आली. त्यात महापालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना सुरक्षित अंतर व मास्क घालावा, अशा सूचनाही वारंवार देत आहे. तरीसुद्धा २० टक्के लोक मास्क न वापरता मला काहीच संसर्ग होणार नाही,ह्ण अशा आविर्भावात फिरत आहेत; त्यामुळे एकापासून अनेकांना त्याची लागण होत आहे.
विशेष म्हणजे लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, महाद्वार रोड, पापाची तिकटी, रंकाळा तलाव चौपाटी परिसर, गंगावेश परिसर, राजारामपुरी, शाहूपुरी, स्टेशन रोड, आदी परिसरांत हातगाडीवरून भाजीपाला व अन्य वस्तू विक्री करणारे फेरीवाले व तरुण मंडळी विनामास्क फिरत आहेत. अनेक तरुण दुचाकीवरून जाताना जणू कोरोनाचा कहर संपला असल्यासारखे दोघे-दोघे एकत्रित फिरत आहेत. यासोबतच अनेक पेठांमधील तरुण मंडळांचे कट्ट्यावर एकत्रित गप्पा मारत बसण्याचे प्रमाणही वाढले आहे.
अनेक पानटपऱ्यांवर, ज्या बहुतांश स्पेशल पाने तयार करतात, अशांच्या दुकानांसमोर युवक मंडळींची गर्दी दिसू लागली आहे. रविवारपासून प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांवर २०० रुपये इतका दंड वसूल करण्याचा फतवा काढला आहे. तरीसुद्धा अनेक महाभाग विनामास्क किंवा मास्क हनुवटीला लावून बिनधास्त फिरत आहेत.
अशा बिनधास्त वागण्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. त्यातून मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. मात्र, मास्क लावून बाहेर पडण्याची अनेक महाभागांची मानसिकता बदलत नाही. यावर प्रशासनाचा २०० रुपये दंडाचा बडगा चांगलाच प्रभावी ठरेल, अशी चर्चा आता सुज्ञ शहरवासीयांतून होत आहे.कपिलतीर्थमध्ये १० माणसांमध्ये दोघेजण विनामास्क, तर चारजणांचे मास्क हनुवटीला आणि चारजणांचे मास्क नियमानुसार तोंडावर आढळून आले. तर लक्ष्मीपुरी बाजारात तर ५० स्त्री-पुरुषांपैकी २० जणांनी अगदी नियमानुसार, तर १० महिलांनी मास्कऐवजी स्कार्फ बांधून पूर्ण चेहराच झाकला होता.
अन्य वीसजणांपैकी ११ जणांनी नावापुरता रुमाल बांधून तोही वेड्यावाकड्या पद्धतीने हनुवटीवर बांधला होता; तर नऊ महाभाग विनामास्कच खरेदीला आले होते. स्टेशन रोड, फोर्ड कॉर्नर, कोंडा ओळ, सुभाष रोड, राजाराम रोडवर प्रत्येक दहाजणांपैकी दोन ते तीनजण विनामास्क फिरताना दिसत होते. बहुतांश मास्क न वापरणारी मंडळी तरुण वर्गातील आहेत.