कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोन, तीन महिन्यांचे वेतन थकले असून तातडीने वेतन अदा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
एकूण ५० असे अधिकारी आहेत. त्यांना सध्या ५५ हजार रुपये वेतन दिले जाते. त्यात मुख्यमंत्र्यांनी १५ हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे परंतु जे मूळचे आहे तेच मिळण्याची पंचाईत झाली आहे. हे सर्वजण कोरोना लढाईत काम करत आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात या डॉक्टरांची काही महिन्यांपूर्वी भरती करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाच्या साथीमध्ये सध्या हेच डॉक्टर युद्धपातळीवर काम करत आहेत. मात्र, त्यांचेच अजून पगार झालेले नाहीत. याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये चौकशी केली असता या डॉक्टरांच्या वेतनापोटी २६ लाख रुपयांचा निधी आलेला आहे.
तो कोषागारामध्ये जमा करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून निधीच न आल्याने काही महिन्यांचा पगार थांबला आहे ही वस्तुस्थिती असली तरी काही डॉक्टरांनी त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे निधी आला तरी त्यांचे वेतन देणे अडचणीचे ठरत असल्याचे सांगण्यात आले.