समीर देशपांडेकोल्हापूर : गेल्या पाच महिन्यात कोरोनाशी सामना करत असताना जिल्ह्यातील १३८ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यांचा थेट कोरोना रूग्णांशी संपर्क येतो अशा पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लागण झाल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. १५ आगस्ट पर्यंतची ही आकडेवारी आहे.गेले पाच महिने कोल्हापूर जिल्हा प्रशासन कोरोनाशी लढा देत आहे. सुरूवातीच्या काळात रूग्णसंख्या मर्यादित होती. मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र रूग्णसंख्येत भरमसाठ वाढ होत गेली. याच दरम्यान आरोग्य विभागाचे काम प्रचंड वाढले.
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे कोरोनाची जबाबदारी दिली गेली आणि पंचायत समित्यांच्या आरोग्य यंत्रणेला प्रत्यक्ष फिल्डवर उतरावे लागले. घरोघरी सर्वेक्षणापासून ते कोविड उपचार केंद्रापर्यंत सर्वत्र हे कर्मचारी असल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील ४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये २० हून अधिक डाक्टरांचा समावेश आहे.दुसरीकडे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तासाठी सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर उतरावे लागले. पुणे, मुंबईसह बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांच्या पहिल्यांदा पोलिसच संपर्कात येत असल्याने आतापर्यंत ४६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्यासह आता थेट मुख्य कार्यकारी अधिकारीच पाझिटिव्ह आले आहेत. उर्वरित पाझिटिव्ह रूग्णांमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, परिचारिका, आशा वर्कर, आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक, शिपाई, कार्यालयीन अधीक्षक यांचा समावेश आहे.विभागाचे नाव पाझिटिव्ह रूग्ण संख्या
- शिक्षण विभाग ३
- सामान्य प्रशासन विभाग १
- ग्रामपंचायत विभाग ५
- ग्रामीण पाणीपुरवठा विभाग २
- आरोग्य विभाग ४७
- एकात्मिक बालविकास विभाग १
- पोलिस दल ४६
- पंचायत समिती ५
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना १
- कंत्राटी कर्मचारी २६
- समाजकल्याण १
- एकूण १३८
- महिला रूग्ण ४५
- पुरूष रूग्ण ९३
तालुका रूग्णसंख्या
- भुदरगड ८
- चंदगड २
- गगनबावडा १२
- गडहिंग्लज १
- हातकणंगले ३१
- कागल ४
- करवीर ६१
- पन्हाळा १
- राधानगरी ५
- शाहूवाडी ७
- शिरोळ ६
- एकूण १३८