कोल्हापूर : कोरोनाची दुसरी लाट डिसेंबर महिन्यात येणार असल्याने तिला प्रतिबंध करण्याकरिता पूर्वतयारी करावी या राज्य सरकारच्या पूर्व सूचनेनुसार महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहर परिसरात एकाच वेळी तीन हजार रुग्णांवर उपचार होतील, अशी यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना संसर्ग रोखण्याची तयारी सुरू झाली. महापालिका हद्दीत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दोन रुग्ण आढळले आणि तेथून पुढे सातत्याने रुग्ण संख्या वाढत गेली. आतापर्यंत शहरात १४ हजार ८२० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जसे रुग्ण वाढतील, तशी कोविड काळजी केंद्रांची निर्मिती करण्यात आली. तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. परंतु आता रुग्णसंख्या घटल्यामुळे अनेक कोविड काळजी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. काही खासगी रुग्णालयांतूनही कोरोनावरील उपचार बंद झाले.एकीकडे कोरोना रुग्ण कमी होत असताना महापालिका प्रशासन सुटकेचा श्वास घेत आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारकडून दुसऱ्या लाटेबाबत सज्ज राहण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महापालिका प्रशासनाने तयार केली सुरू केली आहे. शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्याकरिता ५५ केंद्रे व तेथील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. खासगी रुग्णालयात १७०० बेड असून, त्यातील ८०० ऑक्सिजन बेड आहेत. महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या कोविड काळजी केंद्रातून १२०० बेड असून, त्यातील २५० ऑक्सिजन बेड आहेत. आणखी काही बेड वाढविता येतील का या दृष्टीनेही पाहणी सुरू आहे.
दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोना रुग्णावर उपचार करण्याकरिता यंत्रणा तयार आहे. जादा बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.- निखिल मोरे, उपायुक्त