कोल्हापूर: सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उभे आयुष्य संघर्ष करणाऱ्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील नावाचे ९३ वयाचे काय अजब रसायन आहे, याची प्रचिती कोरोनाने देखील घेतली. त्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीसमोर कोरोनाने देखील गुडघे टेकत हार मानली. आठ दिवसांच्या यशस्वी उपचारांनंतर उत्तरायुष्यातील आणखी एका संघर्षावर यशस्वी मात करत प्रा. पाटील रविवारी सुखरूप घरी परतले.शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे सध्या वयोमान परत्वे आलेल्या आजारपणामुळे रुईकर कॉलनीतील घरीच उपचार घेत आहेत. शरीर साथ देत नसले तरी मन अजूनही खंबीर आहे. त्यामुळेच गेले वर्षभर जीवघेण्या उपचारानाही ते हसत मुखाने सामोरे जात आहेत.सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू झाल्यावर एन. डी. सरांना त्यापासून लांब ठेवण्याची पूर्ण दक्षता घेतली गेली होती. त्यांच्यापर्यंत बाहेरचे कोणी थेट पोहोचणार नाही याचीही संपूर्ण काळजी त्यांच्या कुटुंबीयांनी घेतली होती. रोजच्या भेटीगाठी बंद करण्यात आल्या होत्या. त्यांच्या सेवेसाठी विशेष ब्रदरही नियुक्त करण्यात आले होते. सर्वांच्या कोरोना टेस्ट करूनच त्यांच्यापर्यंत सोडले जात होते.इतकी सारी खबरदारी घेऊन देखील गेल्या आठवड्यात एन. डी. पाटील यांच्यापर्यंत कोरोना पोहोचलाच. साधारण धाप आणि खोकला लागल्यानंतर अँटिजन टेस्ट करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. कुटुंबीयांसह सेवेसाठी असणाऱ्या सर्वांची चाचणी केली. यात सेवेसाठी येणारे एक ब्रदर पॉझिटिव्ह आले.
एन. डी. यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण तरीही त्रास होत असल्याने त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात ते पॉझिटिव्ह आले. यानंतर त्यांना तातडीने अँपल हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले. तेथे तातडीने उपचार केले गेले. त्यांनी नेहमीप्रमाणे उपचारालाही उत्तम प्रतिसाद दिला. आठ दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परत आले.लढाऊ बाणागोरगरीब, श्रमिकांसाठी कायम रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या एन. डी. यांचा लढाऊ बाणा कोरोनानेही पाहिला. तरुण पिढी कोरोनासमोर हात टेकत असतानाही लढाऊ बाणा काय असतो याचा आदर्शच एन. डी. यांनी कोरोनावर मात करुन घालून दिला आहेम्हणून हरवू शकलेवेळीच निदान आणि योग्य उपचार झाल्याने वयाच्या ९३ व्या वर्षी एन. डी कोरोनालाही हरवू शकले.आणि जीव भांड्यात पडलाएन. डी. सरांना कोरोना झाला आहे म्हटल्यावर अनेकांचा जीव कासावीस झाला होता, प्रत्येक जण त्यांच्या घरी फोन करून ख्यालीखुशाली जाणून घेत होता, त्यांची प्रकृती चांगली आहे, उपचाराला प्रतिसाद देत आहे हे ऐकून मनाला बरे वाटत होते, रविवारी दुपारी दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन परतल्याची वार्ता ऐकून कासावीस झालेला जीव भांड्यात पडला.