कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या बाबतीत सोमवारी जिल्ह्याला मोठा दिलास मिळाला. मागच्या चोवीस तासात केवळ ३४ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर गेल्या चार महिन्यात प्रथमच एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे आता जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली असताना ती हा आकडा पार करेल की नाही अशी शंका येण्याइतकी कोरोनाची परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे आरोग्य तसेच जिल्हा प्रशासन पूर्णपणे बिनधास्त झाले आहे. दिवसे दिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नवीन चाचण्यांची संख्या सुध्दा घटत आहे. गेल्या चोवीस तासात आरटीपीसीआर, ॲन्टीजेन व खासगी लॅब मिळून ६१३ चाचण्या झाल्या. त्यामधून ३४ नवीन रुग्ण समोर आले.विशेष म्हणजे आजरा, भुदरगड, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी या पाच तालुक्यात एकही रुग्णाची नोंद झाली नाही.शिरोळ तालुक्यात एक, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले ,कागल तालुक्यात प्रत्येकी दोन, करवीर तालुक्यात तीन रुग्णांची नोंद झाली. कोल्हापूर शहरात मात्री १३ रुग्ण आढळून आले. तर ९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.सोमवारचा दिवस अपवादजुन, जुलै, ऑगस्ट व सप्टेबर या चार महिन्यात कोरोनाची स्थिती फारच गंभीर होती. मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असताना रोज ३० ते ३५ रुग्णांचा मृत्यू होत होता. चार महिन्यात रोज मृत्यू होत राहिले. मात्र या चार महिन्यात प्रथमच एकही रुग्ण सोमवारी दगावला नाही.
- जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या - ४८ हजार२२३
- कोरोनामुक्त रुग्णांची संख्या - ४५ हजार ६५८
- एकूण मृतांची संख्या - १६४३
- उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या - ९२२
- पैकी ५८१ घरातून तर उर्वरित रुग्णालयात उपचार घेत आहेत.