कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गुरुवारी ४४ हजार ७४१ वर जाऊन पोहोचली; तर आतापर्यंत १४५९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील ज्या काही मोजक्या शहरांत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला, त्यांमध्ये पहिल्या १० जिल्ह्यांत कोल्हापूरचा समावेश आहे; परंतु अलीकडे ही रुग्णसंख्या घटत असल्याची माहिती समोर येत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी ३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोज वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे येत्या काही दिवसांत ५० हजारांचा टप्पा ओलांडला जाईल असे दिसते. जिल्हा व आरोग्य प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे बरेच प्रयत्न केले.
जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांत कोरोनाचा झपाट्याने संसर्ग झाला; पण सप्टेबरमध्ये हा संसर्ग नियंत्रणात राहिला आहे. रोज आठशे-हजार नवीन रुग्ण आढळून येत होते, तेथे आता तीनशे, चारशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळेच कोरोना नियंत्रणात असला तरी स्थिर आहे.आतापर्यंत ३४ हजार ०६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, ही एक जमेची बाजू आहे. ६२०० रुग्ण सौम्य लक्षणे असलेले आहेत; त्यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार केले जात आहेत. परिणामी सरकारी तसेच खासगी रुग्णालयांवरील ताण काहीसा कमी झाला आहे.