कोल्हापूर : कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोगही जिल्ह्यात यशस्वी झाले आहेत. ६० दात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. यामुळे २५ अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. कोविड काळजी केंद्र, समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमध्ये एकूण सात हजार ३३२ बेडची उपलब्धता आहे. त्यामध्ये ८०८ ऑक्सिजन बेड आणि २८८ आयसीयू बेड असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
सीपीआर, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन, आयजीएम हॉस्पिटल या कोरोना हॉस्पिटलांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांवर उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रुग्णांना रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची माहिती कळावी; तसेच बेड उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांवर घरी उपचार करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक कोरोनाबाधित घरी उपचार घेत आहेत. प्रशासनामार्फत या सर्वांना किट दिले असून, त्यामध्ये पल्स ऑक्सिमीटर, डिजिटल थर्मामीटर, मास्क, इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत. यांपैकी दोन हजारांहून अधिक आता बरे झाले असल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.कोल्हापूरकरांचे दातृत्वकोरोनाच्या या संकटकाळात अनेक सेवाभावी संस्था, संघटना व व्यक्तींनी कोल्हापूर रिलीफ फंड यांना मदत करून दातृत्वाची परंपरा जपली आहे. त्यात रोटरी मूव्हमेंट, कोल्हापूर, क्रिडाई कोल्हापूर, जैन समाज, उद्योजक व औद्योगिक संघटना, नगरसेवक, घाटगे ग्रुप, व्हाईट आर्मी, होर्डिंग ॲण्ड आऊटसोर्सिंग ॲडव्हर्टायझर्स असोसिएशन, विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था, साखर कारखाने, आदींचा समावेश असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.